अकोला : आमदारांना मिळाले ९.६० कोटी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola MLA got Fund

अकोला : आमदारांना मिळाले ९.६० कोटी!

अकोला : आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन् २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आमदारांना विकास कामांसाठी शासनामार्फत प्रत्येकी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आमदाराला १ कोटी २० लाखांचा निधी मिळाल्याने आठ आमदारांना ९ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला असून आमदारांना विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु अद्यापही प्रत्येक आमदारांचे ३ कोटी ८० लाख शासनाच्या तिजोरीतच असल्याने त्याचा मतदारसंघात निधी वाटप करताना अडचणी येत आहेत.

मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात.

आमदार निधीतून कामे केल्यावर त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. पुढील निवडणुकीत मतांसाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. निवडून आल्यास आमदार निधीतून ही कामे करीन, असे आश्वासन प्रचाराच्या काळात दिली जातात. काही आमदार तर गल्लोगल्ली आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांची जाहिरात करीत असतात. दरम्यान सन् २०२२-२३ या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे करता यावी यासाठी प्रत्येकी आतापर्यंत प्रत्येकी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

जिल्ह्यातील एका आमदारासाठी सदर निधी असल्याने आठ आमदारांचा ९ कोटी ६० लाख रुपयांचा निधी नियोजन विभागाला मिळाला आहे. सदर निधी एकूण निधीच्या केवळ ८ ते १० टक्केच आहे. त्यामुळे आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे प्रस्तावित करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून मतदारसंघात विकासाचा समतोल राखण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

प्रत्येकाला ५-५ कोटीचा निधी

राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी पाच कोटी रुपये करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यामुळे यावर्षापासून आमदारांना एका वर्षात विकास कामांवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात भरघोस कामे करता येतील.

विकास निधी खात्यात जमा

नियोजन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, विधान परिषदेचे सदस्य डॉ. रणजीत पाटील, अमोल मिटकरी व वसंत खंडेलवाल यांना विकास कामांसाठी प्रत्येकी १ कोटी २० लाख रुपये मिळाले आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला प्रत्येक आमदाराला आमदार निधीचे २८ लाख रुपये मिळाले होते. दरम्यान आता शासनामार्फत आणखी निधी मिळाल्याने प्रत्येक आमदाराला १ कोटी २० लाख या प्रमाणे सर्व आमदारांना ९ कोटी ६० लाख रुपये विकास कामांसाठी मिळाले आहेत. उर्वरित निधी लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.

- गिरीष शास्त्री, जिल्हा नियोजन अधिकारी, अकोला

Web Title: Akola Mla Got Fund Under Local Development Works

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top