Akola : मुलीच्या अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियेसाठी आईचा लढा!

सांगवी मोहाडी येथील जंजाळ कुटुंबीयांची मुलीच्या उपचारासाठी धडपड; मदतीची अपेक्षा
Akola
Akolasakal

अकोला : आई म्हणजे यातना, सहनशीलता, समर्पण आणि बरेच काही. आईही कितीही कष्टात असली, तरी प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला तयार असते. याचे एक उदाहरण म्हणजे ज्योती जंजाळ. त्या घरकाम करतात आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती संतोष जंजाळ यांना मजुरी करुन मदतही करतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब कष्टाचे जीवन सुद्धा आनंदाने जगत आहे. परंतु सध्या त्यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी स्नेहा जंजाळ हिचा अपघात झाल्याने तिच्या वैद्यकीय उपचारासाठी जंजाळ कुटुंबातील सर्व सदस्य लढा देत आहेत. मुलगी स्नेहाच्या उपचारासाठी धडपड व चिकाटी आईच्या नात्याचा श्रेष्ठत्व प्राप्त करून देते.

अकोला तालुक्यातील सांगवी मोहाडी येथील संतोष तुकाराम जंजाळ व त्यांची पत्नी ज्योती जंजाळ या मजुरी व इतर कामं करुन आपल्या संसाराचा गाडा चालवतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींपैकी स्नेहा जंजाळ (वय २०) ही मुलगी मोठी असून श्रद्धा लहान आहे, तर मुलगा पाच वर्षाचा आहे. जंजाळ कुटुंबातील स्नेहा ही अभ्यासात हुशार आहे. तिने बारावीत ६० टक्क्यांवर गुण मिळवले.

त्यानंतर स्थानिक श्री शिवाजी महावद्यालयातून पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मेहनती व तल्लख बुद्धीची असल्याने स्नेहाला बी.कॉमच्या पहिला वर्षात ९३ टक्के गुण मिळाले. भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतानाच तिचा दोन महिन्यापूर्वी एक छोटा अपघात झाला. अपघातामुळे तिला उपचारासाठी स्थानिक सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले असता तिची अन्ननलिका खराब झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

त्यासोबतच अन्ननलिकेची शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथील केईएम हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्याचा सल्ला दिला. स्नेहाची वैद्यकीय आरोग्य स्थिती खराब असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावरील शस्त्रक्रिया तूर्तास लांबणीवर टाकली आहे. तिच्या उपचारासाठी जंजाळ कुटुंबाकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांना दानी व्यक्तींकडून मदतीचा हात हवा आहे. याकामासाठी जंजाळ कुटुंबीयांना बार्टीच्या समतादूत ॲड. वैशाली गवई मोलाचे सहकार्य करत आहेत.

तोंडातून अन्न जात नसल्याने पोटातून नळी

स्नेहावर अन्ननलिकेची शस्त्रक्रिया होत असल्याने तिला तोंडातून अन्न, पाणी घेता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या पोटाची छोटी शस्‍त्रक्रिया करुन पोटातून एक कृत्रीम नळी बाहेर काढली आहे. नळीतून तिला द्रवरूपात दररोज नऊ वेळा हाय प्रोटीन पावडर देण्यात येते. परंतु आर्थिक स्थितीमुळे हाय प्रोटीन पावडरवर दोन दिवसाआड बाराशे रुपये खर्च करण्यास जंजाळ कुटुंबीय असमर्थ ठरत आहे.

आरडीसी प्रा. खडसे यांच्याकडून मोलाची मदत

ज्योती जंजाळ या मुलीच्या प्रकृती बाबत माहिती मिळाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) प्रा. संजय खडसे यांनी जंजाळ कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. त्यासोबतच ज्योतीला प्रोटीन पावडर मिळवून देण्यासाठी प्रा. खडसे यांनी काही दानी व्यक्तींसोबत स्वतः फोनवर संपर्क केला. त्याबद्दल जंजाळ कुटुंबीयांनी प्रा. खडसे यांचे आभार मानले आहे.

वजन वाढले तरच शस्त्रक्रिया

स्नेहावर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी तिचे वजन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी तिला हाय प्रोटीन पावडरचे डायट दिले आहे. या प्रोटीन पावडर पावडरची किंमत तब्बल बाराशे रुपये असल्याने व तिला ते दिवसातून नऊ वेळा द्रवरूपात द्यावे लागत असल्याने दोन दिवसात एक प्रोटीन पावडरचा डब्बा स्नेहाला द्यावा लागतो. परंतु आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने मुलीच्या दैनिक वैद्यकीय आहारावर जंजाळ कुटुंबीयांना खर्च करण्यास अडचणी येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com