
महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी (ता.३०) रिसोड तालुक्यातील लोणी (बु.) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्राप्त झाली होती.
वाशीम : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी (ता.३०) रिसोड तालुक्यातील लोणी (बु.) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्राप्त झाली होती.
त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या समुपदेशनाने सदर बालविवाह रोखला.
बालविवाहाबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी एम. चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे, अजय जी. यादव, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर पी. वाळले तसेच रिसोड तालुका संरक्षण अधिकारी गोपाल एस. घुगे यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.
पथकाने रिसोड पोलिस स्टेशनचे गजानन वानखेडे, पोलिस पाटील अंबादास दीक्षे यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले.
जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)