बुलडाणा जिल्ह्यातील ३५० अधिक महाऑनलाईन आयडी बंद

विरेंद्रसिंह राजपूत
Saturday, 10 October 2020

जिल्ह्यातील जवळपास ३५० हून अधिक ग्रा.पं.संगणक परीचालकांचे महाऑनलाईन आयडी कोणतीही पुर्वसूचना न देता अचानक पणे बंद पडले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व तत्सम कार्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इत्यादी सेवा देणे थांबल्याने ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत.

नांदुरा (जि.बुलडाणा)  : जिल्ह्यातील जवळपास ३५० हून अधिक ग्रा.पं.संगणक परीचालकांचे महाऑनलाईन आयडी कोणतीही पुर्वसूचना न देता अचानक पणे बंद पडले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व तत्सम कार्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इत्यादी सेवा देणे थांबल्याने ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत.

जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बंद झालेले आयडी तत्काळ सुरू करण्यात यावे, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर नागरी सुविधा भेटाव्यात. यासाठी बुलडाणा जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी यांनी ता. ५ ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री.राजेंद्रजी शिंगणे यांना निवेदन दिले.

पालकमंत्र्यांनी विषयामध्ये गांभीर्याने लक्ष देत महाऑनलाईनच्या जिल्हा व्यवस्थापकास दूरध्वनीद्वारे संपर्क करून बंद झालेले आयडी तत्काळ सुरू करण्याविषयी सूचना केल्या आहेत. यावेळी मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे सुद्धा उपस्थिती होते.

त्यांनी सुद्धा हा विषय गांभीर्याने घेऊन आयडी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सूचना संबंधितांना केल्या आहेत. बंद पडलेले आयडी तत्काळ सुरू करण्यात यावे यासाठी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शनमुखराजन यांची सुद्धा भेट घेतली.

निवेदन देतेवेळी बुलडाणा जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश खुपसे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश ठोकरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय वाशीमकर, जिल्हा सचिव सचिन झालटे, जिल्हा सहसचिव तथा नांदुरा तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील,देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष मंगेश खरात सचिन तरमळे, सुनील जवंजाळ,ज्ञानेश्वर कवळे,राहुल बघे,शंकर खरात,रितेश राऊत,संदीप इंगळे,अमोल कचाने इत्यादी तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 350 more online IDs closed in Buldana district