
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला. शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी मेहकर तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर. कोवीडची मोफत तपासणी करून घेतली.
हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला. शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी मेहकर तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर. कोवीडची मोफत तपासणी करून घेतली.
या तपासणीत जे शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह सापडले त्यांना योग्य उपचाराचा सल्ला देण्यात आला. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्या अगोदर विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रक असणे आवश्यक होते. यासर्व बाबती नंतर मास्क,सॅनेटाइझर,सोशल डिस्टसिंग या सर्व नियमानचे पालन करून शाळा उघडण्यात आल्या.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे प्रमाण अंदाजे 10 टक्के असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा,महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा पुरस्कार कोरोना काळात करण्यात आला.
मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना द्यावा लागला. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्मार्टफोन अभावी शिक्षणास मुकावे लागले. तर अनेक पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःचे दागिणे गहान ठेवून मुलांना स्मार्टफोन घेऊन दिले.
ग्रामीण भागातील तीस टक्केच विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन असल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. नेटवर्कच्या समस्येमुळे सुध्दा ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना त्रास झाला. आता शाळा सुरू झाल्यानंतर सुध्दा कोरोनामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी इच्छा असून सुध्दा शाळेत जात नसल्याचे निर्देशात येत आहे.
आपला पाल्य शाळेत गेल्यानंतर पाल्याला कोरोना विषाणूचे संक्रमण तर होणार नाही या धास्तीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होवून सहा दिवस उलटून गेले तरी दररोज विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाणात नगण्य आहे.
इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याच्या सूचनेनुसार मेहकर तालुक्यातील 862 शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र सुध्दा दिले. कोरोना नंतर शाळेला विद्यार्थ्यांची नगण्य उपस्थिती मुळे शिक्षक नियमीतपणे शाळेत येत असून वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे करीत आहे.
क्रीडा मैदान विद्यार्थ्यांशिवाय ओस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता मैदानी खेळावर बंधन घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याशिवाय क्रीडा मैदान ओस पडल्याचे दिसून येत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)