पाणी मुबलक पण माती तहानलेलीच! रब्बीच्या आशेवर फेरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

विहिरीत व सिंचन प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असूनही महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कोरडवाहू शेती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे आरोप होत आहे.

रिसोड (जि.वाशीम)  ः विहिरीत व सिंचन प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असूनही महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कोरडवाहू शेती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे आरोप होत आहे.

कधी अस्मानी तर, कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. शेती सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शासनाने लघु तथा मध्यम सिंचन प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च केले. यावर्षी परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, सर्वच लहान-मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

परंतु, महावितरणाच्या सुलतानी धोरणामुळे सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यामुळे तसेच रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाढण्याच्या मार्गावर असून, रब्बी हंगाम हातून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पहिलेच परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक शेतकऱ्याच्या हातून गेले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्यातून कसेबसे सावरत उसनवारीवर रब्बीची पेरणी केली. विहिरी तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा असूनही वीज नसल्यामुळे रब्बीची पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा तसेच नियमित वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जळालेले रोहित्र त्वरित बदलून द्या, दिवसा व सुरळीत वीज पुरवठा करा, अशा मागण्या शेतकऱ्यांसह विविध संघटना करीत आहेत.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

भारनियमनाचा अजब निर्णय
महावितरणच्या वतीने रात्री सहा तास विज दिली जाते. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. वन्यप्राणी व सरपटणारे प्राणी असूनही जीव धोक्यात घालून शेत भिजवावे लागते. महावितरणने रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

पाण्याअभावी पिके सुकली
यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र वीजच नसल्याने शेतात उगवलेले कोवळे पीक कोमेजून जात आहे. खरीप हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची आशा आता रब्बीवर असताना वीज नसल्याने कोवळे पीक कोमेजून जाताना पाहण्यावाचून पर्यायच उरला नाही.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
जिल्ह्यामध्ये शेतकरी विजेसाठी वाट पाहत असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. खासदार भावनाताई गवळी यांनी महावितरणला घेराव घातला होता. हा एक अपवाद वगळता इतर लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News; Agriculture and farmers are in trouble due to wrong policy of MSEDCL