
युट्युब चॅनेलमध्ये बातमी प्रकाशित करू म्हणून रेशन दुकानदाराकडून पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) ः युट्युब चॅनेलमध्ये बातमी प्रकाशित करू म्हणून रेशन दुकानदाराकडून पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
दरम्यान, न्यायालयाने दोघा आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील महात्मा फुले मार्गावर पद्मकुमार शांतीलाल गिरणीवाले यांचे रेशनचे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान आहे.
त्यांच्या रेशन दुकानात येऊन राहुल नायर, गणेश डोके यांनी अर्जदार यांना तुम्ही स्वस्त धान्य दुकानाचे धान्य काळ्याबाजारात विक्री करता, आम्हाला पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाबत वर्तमानपत्रात खोट्या बातम्या प्रसिद्ध करू व तुमच्या शिधापत्रिकाधारकांना तुमच्या दुकानात विरोधात खोट्या तक्रारी करण्यास लावू व तुमच्या दुकानाचा परवाना रद्द करू म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
भीतीपोटी अर्जदार यांनी आरोपींना ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले व पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये ता. २७ ऑक्टोबर रोजी देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधित रेशन दुकानदार पद्मकुमार गिरणीवाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवून तडजोड करायची नसल्याने खंडणीची कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष मंगळवारी सापळा रचला व आरोपींना २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.
याबाबत फिर्यादी पद्मकुमार गिरणीवाले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश गंगाराम डोके, राहुल शिवकुमार नायर (दोघे रा. देऊळगाव राजा) व गोटू शिंदे राहणार अंत्रिखेडेकर या तिघांविरुद्ध खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. सदर कारवाईत गुन्हे शाखेचे पथक प्रमुख इम्रान इनामदार,उपनिरीक्षक अनिल भुसारी प्रकाश राठोड महिला पोलीस कॉन्स्टेबल गीता बामांदे,भरत जंगले,नदीम शेख,संभाजी असोळकर, यांनी सहभाग घेतला.
तिसरा आरोपी फरार
खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना साद देणारा तिसरा आरोपी गोटू शिंदे फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नात आहेत. दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)