खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय भूकंप ?, भाजपच्या अनेक नेत्यांची हाताला घड्याळ बांधण्याची तयारी

विरेंद्रसिंह राजपूत
Tuesday, 27 October 2020

मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा शहर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सासुरवाडी. त्यांची या मतदारसंघाशी पहिल्यापासूनच नाळ जुडली आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा शहर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सासुरवाडी. त्यांची या मतदारसंघाशी पहिल्यापासूनच नाळ जुडली आहे.

तसाही त्यांचा चाहता वर्ग या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात असल्याने व लेवा पाटीदार समाजही बहुसंख्येने असल्याने रावेर लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी छाप या मतदारसंघावर सोडली आहे.

आता नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन भाजप विरोधात दंड ठोकून हातात घड्याळ बांधले असल्यामुळे आगामी काळात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही.

माजी महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी खान्देशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी मोट बांधून पक्षाला उभारी देण्याचे काम केले. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातही रावेर लोकसभेच्या दोन पंचवार्षिक पासून त्यांचे या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे यांचे माधमातून जवळचे संबंध येत गेले.

त्यांनी नांदुरा व मलकापूर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. सोबतच ते ज्या समाजाचे आहेत, तो लेवा पाटीदार समाजही या मतदारसंघात बहुसंख्येने असल्याने त्यांचे साहजिकच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले आहे.

आता नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने सध्या तरी फ्रंटलाइनमध्ये अजून तरी भाजपच्या कुणीही नेते किंवा कार्यकर्त्यांनी अधिकृत प्रवेश घेतला नसला तरी आगामी काळात बऱ्यापैकी भाजपमधील व इतर पक्षातील फार मोठा गोतावळा नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करतील, एवढे निश्चित.

 

खासदार रक्षाताई खडसेंमुळे कार्यकर्त्यांचे तळ्यात मळ्यात
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सदस्यत्व पदाचे घड्याळ हातावर बांधले असले तरी त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपमध्येच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही नेते व कार्यकर्ते मंडळींनी सावध भूमिका घेत पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय तूर्त राखून ठेवला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Khadse's NCP entry will cause a political earthquake ? Many BJP leaders ready to tie a watch on their hands