esakal | सातपुड्याच्या पायथ्याशी गांजा तस्करीचे जाळे?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Cannabis smuggling network at the foot of Satpuda?

अकोला जिल्ह्यातील गांजा तस्करीतील धागे दोरे सातपुड्याच्या पायथ्याशी पसरलेले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एका जणाला ता.२७ सप्टेंबर रोजी अकोला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून या तालुक्यात गांजा सप्लाय तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन संशयाच्या घेऱ्यात आले आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी गांजा तस्करीचे जाळे?

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : अकोला जिल्ह्यातील गांजा तस्करीतील धागे दोरे सातपुड्याच्या पायथ्याशी पसरलेले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एका जणाला ता.२७ सप्टेंबर रोजी अकोला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून या तालुक्यात गांजा सप्लाय तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन संशयाच्या घेऱ्यात आले आहे.


मागील आठवड्यात अकोला जिल्ह्यातील सातपुडा लगत हिवरखेड पोलिस स्टेशन हद्दीतील बोरवा परिसरात गांजा पकडण्याची मोठी कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केली. त्या कारवाईत तब्बल १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती.

तपासात संग्रामपूर तालुक्यात गांजाचा सप्लाय होत असावा या संशयावरून अकोला पोलिसांनी सोनाळा पोलिस स्टेशन अंतर्गत टुनकी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये मोठ्या हस्तीचा हात असल्याची तालुक्यात चर्चा आहे.


असे झाले संग्रामपूर ‘कनेक्शन’ उघड
अकोला गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट पोलिस स्टेशन हद्दीतील अडगाव खुर्द येथे राजू सोळंके याच्या घरातून ४० किलो गांजा, कैलास पवार व राजू सोळंके या दोघांच्या मालकीचा जप्त केला होता. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन हद्दीतील बोरवा येथील शत्रुघन चव्हाण त्याच्या घरातून तब्बल १ क्विंटल ६ किलो गांजा जप्त केला.

या दोन कारवाईमध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी अडगाव खुर्द येथील राजू सोळंके व वारी हनुमान येथील कैलास पवार या दोघांना अटक करण्यात आली तर बोरवा येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता.

रविवारी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एकाला ताब्यात घेतल्याने दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शेजारच्या जिल्ह्यातून आलेला गांजा संग्रामपूर तालुक्यातील कुठे-कुठे सप्लाय केला जातो हे शोधण्याचे आव्हान सोनाळा आणि तामगाव पोलिसां पुढे आहे.


सातपुड्यातील चोरट्या मार्गाचा वापर
अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी गांजा तस्करीचे जाळे विणले जात आहे. त्यासाठी मध्यप्रदेशमधून सदर गांजा सातपुडा पर्वतामधील चोरट्या मार्गाने या भागात येत असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दिशेने तपास करून अकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला होता. त्यामुळे आता दोन्ही जिल्ह्यातील या परिसरातील पोलिसांना गांजा तस्कारांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)