
वाकाटकाची राजधानी म्हणून ख्याती असलेले वाशीम शहर खड्ड्याची राजधानी झाले आहे. कंत्राटदारांच्या अतिलाडाने दीड वर्षापूर्वी बनविलेले रस्ते बदहाल झाले असून, नागरिकांना पुन्हा यातना सोसाव्या लागत आहेत.
वाशीम : वाकाटकाची राजधानी म्हणून ख्याती असलेले वाशीम शहर खड्ड्याची राजधानी झाले आहे. कंत्राटदारांच्या अतिलाडाने दीड वर्षापूर्वी बनविलेले रस्ते बदहाल झाले असून, नागरिकांना पुन्हा यातना सोसाव्या लागत आहेत.
शहरामधे सर्वच मुख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. वसाहतीमधील अनेक रस्ते गेल्या दीड वर्षात नवीन केले होते मात्र, आज या रस्त्यांची पार रया गेली आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण करताना नियमानुसार साहित्य वापरले नसल्याची बाब आता समोर येत आहे.
डांबरीकरण करताना आधी बिबिएम केले पाहिजे होते. मात्र, अंतर्गत रस्ते करताना मुरूमावरच दोन ते तीन इंच डांबराचा थर पसरवून रस्त्याचे सोपस्कार पार पाडल्याने काही रस्ते सहा महिन्यात पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. अनेक नवीन वसाहतीत अजूनही रस्ते नाहीत. मात्र राजकीय नेत्यांच्या ले-आउट मध्ये एकही घर नसताना रस्ते चकाचक झाले आहेत. परंतु, इतर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी आहेत की, स्वतःचे साध्य करून घेण्यास हे समजने स्थानिक नागरिकांना कठीण झाले आहे. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
भूमिगत गटार योजनेचा अजूनही ताप
शहर डासमुक्त करण्याचे आश्वासन देवून तत्कालीन राजकारण्यांनी शहराच्या माथी भूमिगत गटार योजना बसविली. चार वर्ष शहर खोदून काढले रस्ते उखडले मात्र, ही योजना भूमिगतच राहिली. शासनाच्या नियमानुसार भूमिगत गटार योजना राबविल्यानंतर रस्ते विकासासाठी मिळणाऱ्या अनुदानातून कंत्राटदारी पोसली गेली. याच पोसलेल्या कंत्राटदारीने शेकडो कोटी रूपयांचे रस्ते बनवून शहराला खड्ड्यात लोटण्याचे पाप केले आहे.
शहरवासींच्या यातनांना नाही अंत!
शहरामधे एकही रस्ता सुस्थितीत राहिला नाही. एखादा रस्ता चांगला झाला असला तर, मधेच पुलाजवळ कसर काढली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याच रस्त्याने मार्गाक्रमण करताना यातना सोसाव्याच लागणार हा अलिखित नियमच झाला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)