esakal | मेळघाटातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला मुख्यमंत्र्यांचाच विरोध, वाघांच्या अधिवासाला धोका पोहचण्याची शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Chief Ministers opposition to Melghat railway line, possibility of endangering tiger habitat

व्याघ्र संवर्धनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. ते बघता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे प्रस्तावित गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे.

मेळघाटातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला मुख्यमंत्र्यांचाच विरोध, वाघांच्या अधिवासाला धोका पोहचण्याची शक्‍यता

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : व्याघ्र संवर्धनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. ते बघता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे प्रस्तावित गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे.


रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. या रेल्वे मार्गाला लागून 23य48 कि.मी.चे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्‍यांना तसेच आजूबाजूच्या गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


गाड्यांची गती वाढणार असल्याने धोका
1973-74 मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. 2768.52 चौ. किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्‍यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील 16 गावे आणि या गाभ्याबाहेरील 6 गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 कि.मी. परीघातालीच होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

वन्यजीव संस्थांचाही विरोध
भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या वान अभयारण्यातील 160.94 हेक्‍टर वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा, असे कळविले आहे. रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे; पण तसे करताना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image