
कोरोनाच्या भीतीने शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड आला खरा...पण या विवाहासारख्या शुभकार्यात जागरण - गोंधळाची परंपरा जोपासणाऱ्या वाघ्या-मुरळी कलावंतांवर मात्र बिकट परिस्थिती आलीय..हातच काम बंद झाल्याने खायचं काय?...अन् जगायचं कसं हा गहन प्रश्नच त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.
देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या भीतीने शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड आला खरा...पण या विवाहासारख्या शुभकार्यात जागरण - गोंधळाची परंपरा जोपासणाऱ्या वाघ्या-मुरळी कलावंतांवर मात्र बिकट परिस्थिती आलीय..हातच काम बंद झाल्याने खायचं काय?...अन् जगायचं कसं हा गहन प्रश्नच त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.
अनादिकालापासून आपल्या कलेच्या माध्यमातून धर्मजागरण कुळधर्म कुळाचार पालन समाज प्रबोधन याद्वारे समाजसेवेचे कार्य वाघ्या मुरळी लोककलावंत करत आहेत यांना तात्काळ मानधन देण्याची मागणी वाघ्या मुरळी परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता त्यामुळे या कलावंतांना जगण्या पुरते ही उत्पन्न मिळू शकले नाही.
त्यातच कोरोना सारख्या सुरू असलेल्या महामारीने लॉकडाउनमुळे जागरण गोंधळ कार्यक्रम कुठेच होऊ न शकल्याने वाघ्या मुरळी लोककलावंत आर्थिक संकटात सापडल्याने परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या निवेदनाव्दारे त्यांनी उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान मंजूर करावा, मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या मुरळी लोककलेची शासनदरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी, या कलावंताच्या निवासासाठी शासनाकडून जमीन/ घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, या कलावंतांना कायमस्वरूपी मानधन सुरू करावे, महाराष्ट्रातील लोककलावंत यासाठी स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या या ठकाजी मेहेत्रे, अमोल जायभाये,गोविदराव दारकोंडे,मार्तंड साठे,भगवान मुंढे, केशव खांडेभराड,तुकाराम आढाव, रुस्तूम बोबडे, अंबादास मांटे, विजय जायभाये शासनाकडे केल्या आहेत.
कोरोनामुळे लग्नसमारंभच रद्द झाल्याने हे लोककलावंत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विवाहानंतर कुलदेवतेचे स्मरण व्हावे, यासाठी जागरण-गोंधळ घातला जातो, यासाठी वाघ्या-मुरळी या लोककलावंतांना बोलवले जाते. जागरण- गोंधळातील हे कलावंत आपली कला सादर करत एका कार्यक्रमाचे सुमारे पाच हजारांपुढे पैसे घेतात. लग्नसराईत हे कलावंत खूप व्यस्त असतात.
कारण वर्षभरातील मोजकेच दिवस त्यांच्याकडे असतात. मात्र यंदा कोरोनाने सर्वच विवाहसोहळे अनेकांनी पुढे ढकलले, तर काहींनी अवघ्या दहा ते पंधरा जणांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतला. यामुळे या कलांवतांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावात अशा कलावंतांचा गट आहे. मात्र कोरोनाने त्यांचा रोजगारच हिरावल्याने या कलावंतांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे अशा कलावंतांना मानधन द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)