esakal | मद्यपींनो दारू जरा जपूनच प्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Counterfeit liquor sellers active in the city; Neglect of excise department

कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच दुकाने रात्री ७ नंतर बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र मंगरुळपीर शहरातील काही विदेशी दारुचे दुकाने त्यांच्या आदेशाला धुडकावत सर्रास रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरूच ठेवत असून, बनावट दारू विक्रेत्यांनी त्यांचा माल सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्याची चर्चा खुद्द मद्यपींमध्ये आहे.

मद्यपींनो दारू जरा जपूनच प्या!

sakal_logo
By
शरद येवले

मंगरुळपीर (जि.वाशीम)  : कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच दुकाने रात्री ७ नंतर बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र मंगरुळपीर शहरातील काही विदेशी दारुचे दुकाने त्यांच्या आदेशाला धुडकावत सर्रास रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरूच ठेवत असून, बनावट दारू विक्रेत्यांनी त्यांचा माल सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्याची चर्चा खुद्द मद्यपींमध्ये आहे.

ही बाब उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला माहीत नाही असे नाही तर, त्यांच्या अर्थकारणाने बनावट दारू विक्रेते सर्रास बनावट दारूची विक्री करीत असल्याची माहिती ‘सकाळ’ला प्राप्त झाली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात मंगरुळपीर शहर, शेलुबाजार परिसरात एकूण चार देशी दारूचे दुकान, दहा तेे अकरा वाईन बार व एक देशी-विदेशी दारूचे दुकान आहे.

तालुक्यात एकूण १० ते ११ वाईनबार आहेत. यामध्ये दरदिवशी शेकडो मद्यपी दारूचा आस्वाद घेत असतात. परंतु, मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मार्च ते मे पर्यंत सर्वच दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते.

नेमके याच संधिचा फायदा घेऊन येथील काही वाईनबार चालकांनी छुप्या मार्गाने बनावट दारूची अव्वाच्या सव्वा भावात विक्री केली. परंतु राज्य शासनाने जूनपासून वाईनबार चालकांना दुपारी २ वाजेपर्यंत एम.आर.पी. भावाने विक्री करण्याची परवानगी दिली. त्यांनतर वेळेत शिथिलता करून रात्री ७ पर्यंत दारू विक्रीची परवानगी दिली.

मात्र तोंडाला रक्त लागलेल्या व लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शहरातील काही महाभागांनी बनावट दारू विक्री अद्यापही सुरू ठेवल्याची चर्चा आहे. या बनावट दारू विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात व शहरातील उशिरापर्यंत चालणाऱ्या काही धाब्यावर सुद्धा त्यांच्या मालाची विक्री सुरू ठेवल्याचे बोलले जात आहे. यामुळे युवा पिढीच्या आरोग्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही नुकसान होत आहे. असे नाही की, याबद्दल पोलिस विभागाला व राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती नाही.

परंतु, या दोन्ही विभागातील काही कर्मचाऱ्यांना बनावट दारू विकेत्यांच्या पापाचा काही हिस्सा मिळत असल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे. कमी भावात जास्त नफा मिळत असल्याने यांनी त्यांच्या फंटरद्वारे ग्रामीण भागातही मोर्चा वळविला आहे. मंगरुळपीर, कारंजा व मानोरा या तीन तालुक्याचे उत्पादन शुल्क निरीक्षकांचे कार्यालय मंगरुळपीरला आहे.

सध्याच्या निरीक्षकांची बदली अकोल्याला झाली मात्र, दुसरे निरीक्षक येईपर्यंत जुन्याच निरीक्षकांकडे या तिन्ही विभागाचा चार्ज असून सदर निरीक्षक आता अकोल्याला राहत असल्याने बनावट दारू विक्रेत्यांना राण मोकळे झाले असल्याचेही बोलले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याची भणक जिल्हा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना नाही का? नसेल तर आता माहिती काढून कारवाई करा, अशीही मागणी होत आहे.


‘ड्राय डे’च्या दिवशी जोमात विक्री
‘ड्राय डे’ च्या दिवशी मंगरुळपीर शहरात अवैद्य व बनावट दारू विक्री जोमात चालते. या बनावट दारूमुळे किडनी, लिव्हर, मेंदूविकार, हृदय विकार व अशक्तपणा यासारखे आजार होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. अशा बनावट दारू विक्रेत्यांची माहिती घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील काही सुज्ञ नागरिक करीत आहेत.

कारवाई करणे सुरूच आहे. आपण आमच्या कार्यालयात या आम्ही तुम्हाला कारवाईची माहिती देतो.
- अतुल कानडे, राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक, वाशीम

(संपादन - विवेक मेतकर)