अकोला: धोक्याची घंटा कायम; मृत्यूदर राज्यात चौथ्या स्थानी

सुगत खाडे  
Wednesday, 30 September 2020

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूदर सुद्धा वाढतच आहे. मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने राज्यात अकोला जिल्हा मृत्यूदराच्या बाबतीत ३.१ टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे.

अकोला  ः कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूदर सुद्धा वाढतच आहे. मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने राज्यात अकोला जिल्हा मृत्यूदराच्या बाबतीत ३.१ टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे.

सर्वाधित ४.४ मृत्यूदर मुंबईचा असून दुसऱ्या स्थानी परभणी (३.५), तिसऱ्या स्थानी सोलापूर (३.२) व पाचव्या स्थानी सांगली (३.०) आहे. दरम्यान जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होत नसल्याने प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा सध्या वेगाने प्रसार होत आहे. टाळेबंदी, प्रतिबंधित क्षेत्र आणि इतर खबरदारीच्या उपाय-योजनांनंतरही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याने महापालिका क्षेत्रानंतर आता कोरोनाचे ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत.

रस्त्यांचा संपर्क नसलेल्या गावांमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदीमुळे खंडीत झालेली कोरोनाची साखळी आता मिशन बिगीन अगेनच्या काळात मात्र झपाट्‍याने वाढत आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात आता कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या धडकी भरणारी असून त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे.

१ पासून २९ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ७५ वर जावून पोहोचली आहे. म्हणजेच जिल्ह्यात दर दिवशी दोन-तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २२६ वर जावून पोहचली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले
गत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक होते. परंतु आता जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्‍याने वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा कमी होत आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ६४.३ टक्क्यांवर पोहचला आहे. धूळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ९०.२ टक्के आहे. जळगावचा रिकव्हरी रेट ८२.९ टक्के असून मुंबई ८२.१, अहमदनगरचा रिकव्हरी रेट ८० टक्के आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mortality rate ranks fourth in state, number of positive patients continues to rise