महाबीजसह आणखी तीन कंपन्यांवर बोगस बियाणे प्रकरणी कोर्ट केस, आतापर्यंत एकूण पाच कंपन्यांवर खटले दाखल

सुगत खाडे  
Thursday, 6 August 2020

खरीप हंगात शेतकऱ्यांनी मोठी उमेद ठेवून सोयाबीचे बियाणे पेरले. पेरण्या आटोपल्यानंतर पाऊससुद्धा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्यामुळे शेतकरी फसव्या बियाण्यांच्या दुष्टचक्रात सापडले.

अकोला  ः वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी सोयाबीनचे बोगस बियाणे मारणाऱ्या तीन कंपन्यांविरोधात बार्शीटाकळी न्यायालयात कोर्ट केस (खटले) दाखल करण्यात आली.

त्यामध्ये वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीजचा समावेश आहे. सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात सदर कारवाई करण्यात आली.

यावर्षी खरीप हंगात शेतकऱ्यांनी मोठी उमेद ठेवून सोयाबीचे बियाणे पेरले. पेरण्या आटोपल्यानंतर पाऊससुद्धा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्यामुळे शेतकरी फसव्या बियाण्यांच्या दुष्टचक्रात सापडले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे शेकडो एकरवरील पेरण्यासुद्धा उलटल्या. दरम्यान, हा सर्व प्रकार झाल्यानंतर जुलै महिन्यात महाबीजसह सहा मोठ्या कंपन्यांचे बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचा ठपका बियाणे गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळांनी ठेवला.

त्यामुळे संबंधित सहा बियाणे कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नोटीस जारी करण्यात आली. त्यापैकी तीन कंपन्यांनी दिलेले खुलासे योग्य नसल्यामुळे कृषी विभागाने संबंधित वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबिजच्या विरुद्ध बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातूनच सदर कंपन्यांचे बियाणे नमुने घेण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रक्रिया बार्शीटाकळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी चांदुरकर यांनी पार पाडली.

यापूर्वी दोन कंपन्यांवर कोर्ट केस दाखल
अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी या पूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात दोन कंपन्यांवर कोर्ट केस दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस या दोन कंपन्याचा सहभाग होता. सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात सदर कारवाई करण्यात आली होती.

सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरणी तीन कंपन्यांविरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज या कंपन्यांचा समावेश आहे.
- मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी,
जिल्हा परिषद, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Court case in bogus seeds case against three more companies including Mahabeej, a total of five companies have been sued so far