यंदा दिवाळी नाहीच!, शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचं झालं मातेरं!

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 21 October 2020

मागील काही दिवसांपासून पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शिरपूर व परिसरातील मुख्य पीक ‘पिवळे सोने’ अर्थात सोयाबीनचं पुरतं मातेरं झाल आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकले असून, त्यांना दिवाळी अंधारात जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शिरपूर (जि.वाशीम) ः मागील काही दिवसांपासून पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शिरपूर व परिसरातील मुख्य पीक ‘पिवळे सोने’ अर्थात सोयाबीनचं पुरतं मातेरं झाल आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकले असून, त्यांना दिवाळी अंधारात जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सोयाबीन सोंगणीला आले असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शिरपूरसह परिसरामध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोंगूण वाळत टाकलेल्या सोयाबिनला पाण्यामुळे जाग्यावर कोंब फुटले आहेत तर, सोयाबीनच्या गंजीमध्ये सुद्धा पाणी जाऊन सोयाबीनची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे आधिच उत्पादन कमी व मालाची प्रत खराब झाल्यामुळे मातीमोल भावात विक्री करावी लागत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

येणारी दिवाळी कशी साजरी करावी, या विवंचनेत सध्या शेतकरी सापडल्याचे चित्र आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. मात्र स्थानिक नेते, राजकीय पदाधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. शिरपूर परिसरामध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असताना अजूनही नुकसानीचा ना सर्व्हे करण्यात आला, ना पाहणी करण्यात आली, ना नुकसान भरपाई देण्यात आली! बळीराजा प्रति असंवेदनशीलता दिसून येत आहे.

बळीराजाच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधिंनी त्यांच्या व्यथा जाणून घेणे गरजेचे आहे. बळीराजाला वाऱ्यावर न सोडता तातडीने नुकसानीचे सर्व्हे करून आर्थिक मदत देऊन बळीराजाला आधार देण्याची गरज असून, तसे केले तरच बळीराजाची दिवाळी प्रकाशमान होईल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Damage to farmers soybeans