
वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदिल झाला आहे.त्यात ढगाळ वातावरणा बरोबरच दाट धुक्याने वेढले आणि सोबतच बोचर्या गुलाबी थंडीने सुद्धा आपली चाहूल दाखवली आहे.
चांडोळ (जि.बुलडाणा) : वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदिल झाला आहे.त्यात ढगाळ वातावरणा बरोबरच दाट धुक्याने वेढले आणि सोबतच बोचर्या गुलाबी थंडीने सुद्धा आपली चाहूल दाखवली आहे.
ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन सुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यात दाट धुक्यामुळे समोरासमोरील दृश्य सुद्धा दिसेनासे झाले आहे. वाहनधारकांना तर भरदिवसा सुद्धा लाइट सुरू करून आपली वाहने चालविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
परंतु या ढगाळ वातावरणामुळे तसेच दाट धुक्यामुळे बळीराजा मात्र हतबल झाला आहे.ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांना रब्बी पिकांवर अतिरिक्त औषध फवारणी करण्याचा अतिरिक्त आर्थिक ताण आला आहे. सकाळी 10 वाजे पर्यंत दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली होती.जणू गावाने महाबळेश्वरचे रूपच धारण केले होते.चिमुकल्यांसाठी तर हा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला.
ढगाळ वातावरणामुळे उबदार कपड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना नागरिक दिसत आहे.ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. बळीराजाच्या शेतात बहरलेला गहू, हरभरा व तूर या पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे.त्यामुळे ढगाळ वातावरण आणि त्यात धुके रब्बी पिकांसाठी नुकसानदायक असल्याचे मत शेतकर्यांनी सकाळशी बोलताना आपल्या भावना पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केले. लहान चिमुकले व आबालवृद्धांना सुद्धा ढगाळ वातावरणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्याचे चित्र सध्या दवाखान्यात गर्दीतून पहावयास मिळत आहे.त्यात आणखी दाट धुक्याची भर पडल्याने वातावरणात प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येत आहे.
धुके पाहण्याचा चिमुकल्याचा हट्ट
धुक्याने समोरा समोरील दृश्य जेव्हा दिसेनासे झाले व संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढल्या गेले तेव्हा लहान चिमुकल्यांना त्या धुक्याचे नवलच वाटले.त्या दाट धुक्यात आपल्या पालकांना घराबाहेर घेऊन जाण्याचा हट्ट अनावर झाला.धुके पाहण्याचा चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद घेतला तसेच त्याबद्दल विविध प्रश्नांचा भडिमार केला.
आरोग्यासाठी हानिकारक
ढगाळ वातावरणामुळे लहान चिमुकल्यांना तसेच आबालवृद्धांना सर्दी,ताप,खोकला या सारखे लक्षणे आढळून येतात.त्यामुळे या ढगाळ वातावरणामुळे ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात सर्दी,खोकला व तपाचेच रुग्ण दिसत आहे.ढगाळ वातावरणात प्रत्येक व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रब्बी पिकांना फटका
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने तसेच दाट धुक्यामुळे रब्बीच्या हरभरा व तुरीवर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.खरीप पिकाचे अतोनात झालेले नुकसान रब्बीत काही प्रमाणात भरून काढू या आशेने बळीराजाने मेहनत घेतली आहे परंतु ढगाळ वातावरणामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे
(संपादन - विवेक मेतकर)