esakal | जिल्हाधिकाऱ्यांसोबत पुन्हा चर्चा फिस्कटली, वारकऱ्यांचे आज भव्य भजन-कीर्तन आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Discussion with District Collector fizzled out again, grand bhajan-kirtan agitation of Warkaris today

 सरकारने वारकऱ्यांना शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत सात दिवसांपासून गणेश महाराज शेटे यांचे नियमित तर इतर वारकऱ्यांचे साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत पुन्हा चर्चा फिस्कटली, वारकऱ्यांचे आज भव्य भजन-कीर्तन आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : सरकारने वारकऱ्यांना शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत सात दिवसांपासून गणेश महाराज शेटे यांचे नियमित तर इतर वारकऱ्यांचे साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरू आहे.

सदर उपोषण सोडवण्यासाठी मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सदर बोलणी दरम्यान तोडगा न निघाल्याने वारकऱ्यांनी त्यांचे आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आंदोलनाअंतर्गत बुधवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य भजन कीर्तन करण्यात येईल, त्यामध्ये विदर्भातील वारकरी सहभागी होतील, अशी माहिती उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी बोलणीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

वारकऱ्यांना भजन, कीर्तन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांनी सरकारकडे केली आहे. परंतु सदर मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने गत सात दिवसांपासून गणेश महाराज शेटे सतत उपोषण करत आहेत. त्यांची तब्बेत खालावत आहे. दरम्यान त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील संतमंडळी दररोज फार मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचत आहेत.

त्याअंतर्गत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राम गव्हाणकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. दरम्यान दोन डिसेंबरपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राजकीय पक्षांचा पाठिंबा स्वीकारला जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते.

परंतु राजकीय पाठबळ न घेतल्यामुळे सरकार वारकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, हे दिसून आले आहे. त्यामुळेच काही संत मंडळींच्या आग्रहास्तव सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी बुधवारी (ता. ९) होणाऱ्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह वारकरी पोशाखात सहभागी व्हावे आणि वारकऱ्यांच्या लढ्याला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

वारकऱ्यांसह मान्यवरांच्या भेटी
वारकऱ्यांच्या उपोषणाला मंगळवारी (ता. ७) विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये महादेव महाराज निमकांडे, विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे, ज्ञानेश्वर महाराज जावरकार, ज्ञानेश्वर महाराज नावकार, गणेश महाराज जायभाये, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, श्रीधर महाराज तळोकार, विजय महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, बाभूळकर महाराज, गणेशराव कळस्कार, गजानन मोडक, संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे कार्याध्यक्ष विजय ढोरे, प्रशांत आकोते, वामनराव कवडे (प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र धोबी परिट महासंघ) आदींची उपस्थिती होती.


लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेवू
सरकारने वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यासंबंधी लेखी आश्वासन द्यावे त्यानंतरच आमरण उपोषण मागे घेण्यात येईल. लेखी आश्वासन शक्य नसेल तर मुख्यमंत्री उद्‍धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे चर्चा करून वारकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक उत्तर दिल्यास वारकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात येईल. परंतु मागणी मंजुर न झाल्यास पंढरपुर येथे भव्य आंदोलन करण्यात, येईल असा इशारा उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी दिला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image