esakal | खरीप पिकं हातची गेल्यानंतर सुद्धा ‘उत्तम’ पैसेवारीची मोहर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Even after the kharif crop is gone, the best payout

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

खरीप पिकं हातची गेल्यानंतर सुद्धा ‘उत्तम’ पैसेवारीची मोहर

sakal_logo
By
सुगत खाडे

अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

. परंतु त्यानंतर सुद्धा सुधारीत पैसेवारीची ‘उत्तम’ मोहर लागल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सरकारी सवलती मिळण्याचा मार्ग खडतर झाला आहे. खरीपातील लागवडी याेग्य ९९० गावांचे निरीक्षण केल्यानंतर प्रशासनाने पैसेवारी जाहीर केल्याने अतिवृष्टी, किडींचा हल्ला व अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.


खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैसाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे.

हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते.

यानंतर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ६७ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.


शेतकरी दुष्टचक्रात; परंतु पैसेवारी ‘उत्तम’च
यावर्षी शेतकरी अस्मानी संकटांच्या मालिकेत सापडला. सुरूवातीला पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पेरण्या कराव्या लागल्या. उडीद पीक काढणीला आले असतानाच पावसाने हजेरी लावल्याने उडीद हातचे गेले. मूगावर व्हायरसने हल्ला केल्याने मूग पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीनची अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अतिवृष्टीने पाणी फेरले. सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. त्यामुळे सोयाबीनला कोंब फुटले. पावसात न भिजलेल्या सोयाबीनचा उतारा सुद्धा घसरला. कपाशीवर सुद्धा बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे संकटाच्या मालिकेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उत्तम पैसेवारीने सुद्धा ‘दगा’ दिल्याने सरकारी मदत सुद्धा हुलकावणी देणार असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी
तालुका   गाव      पैसेवारी
अकाेला  १८१      ६७
अकाेट  १८५      ७०
तेल्हारा  १०६      ६३
बाळापूर १०३      ६९
पातूर       ९४      ६९
मूर्तिजापूर १६४    ५९
बार्शीटाकळी १५७ ६९

एकूण      ९९०     ६७

(संपादन - विवेक मेतकर)