थंडीत गर्मीचा अनुभव; वातावरणातील बदल घातकच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

अतिवृष्टीनंतर कडाक्याच्या थंडीची अपेक्षा असलेल्या अकोलेकरांना थंडी तर नव्हे पण थंडीच्या दिवसांमध्ये गर्मीचा अनुभव मिळत आहे. गत काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने वातावरणात टोकाचा बदल जाणवत आहे.

अकोला  ः अतिवृष्टीनंतर कडाक्याच्या थंडीची अपेक्षा असलेल्या अकोलेकरांना थंडी तर नव्हे पण थंडीच्या दिवसांमध्ये गर्मीचा अनुभव मिळत आहे. गत काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने वातावरणात टोकाचा बदल जाणवत आहे.

वातावरणातील हा बदल पिकांसाठी घातक ठरणारा असून, विषाणूज्वरांच्या आजारपणात वाढ करणारे ठरू शकते.

मॉन्सूनचा काळ जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापासून थंडीचा जोर वाढायला लागतो. मात्र यावर्षी अर्धा नोव्हेंबर उलटला. दिवाळी सणही आटोपला तरी थंडी अनुभवायलाच मिळाली नाही. उलट कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांना पावसाळ्यातील दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. वाढलेले तापमाण आणि वातावरणातील बदलाने आजारपणही वाढत आहे. हे वातावरण पिकांसाठीही घातक ठरणारे असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे. त्यात पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे.

गुरुवारपर्यंत चिंता
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण आहे. ही स्थिती १९ नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अकोला जिल्ह्यात १९ आणि २० नोव्हेंबर रोजी काही भागात तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

तापमानात वाढ
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण आहे. परिणामी दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ जाणवत आहे. मंगळवारी (ता.१७) अकोल्यातील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.

तूर पिकासाठी घातक
वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा पादुर्भाव दिसून येत आहे. आधीच बोंड अळीने कपाशी, अतिवृष्टीने सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी हातातून गेल्याने तुरीबाबत शेतकरी आस लावून आले. मात्र वातावरणातील बदलाने तुरीचे पीक सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कीड झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. याशिवाय ढगाळ वातावरणाचा फटका रब्बीतील पिकांनाही बसण्याची शक्यता आहे.

विषाणू ज्वराचे रुग्ण वाढणार
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलामुळे दमट व गर्मी जाणवत आहे. हे वातावरण विषाणू ज्वरासाठी पोषण असल्याने जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याने रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Experience the cold heat; Climate change is detrimental to crops