esakal | प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांची उसाला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Farmers prefer sugarcane even in adverse conditions

 साखरकारखान्याची वाणवा, खारपानपट्टा, कधी दुष्काळ तर कधी अवकाळीसह अतिवृष्टी, अशा विविध समस्यांचा भडीमार असलेल्या प्रतिकूल परिस्थितही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उस लागवडीला पसंती मिळत असून, दिवसेंदिवस लागवड क्षेत्र सुद्धा वाढत आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांची उसाला पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : साखरकारखान्याची वाणवा, खारपानपट्टा, कधी दुष्काळ तर कधी अवकाळीसह अतिवृष्टी, अशा विविध समस्यांचा भडीमार असलेल्या प्रतिकूल परिस्थितही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उस लागवडीला पसंती मिळत असून, दिवसेंदिवस लागवड क्षेत्र सुद्धा वाढत आहे.

रसवंती, गुळनिर्मिती व खाण्यासाठी उसाची मागणी अधिक असल्यामुळे त्यासाठीच्या उस उत्पादनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी एक नगदी पिकाचा विकल्प मिळाला आहे.


ऊस म्हटले की, प्रत्येकाच्या नजरेसमोर उसापासून निर्मित साखरेचे व गुळाचे उत्पादन येते. परंतु, उसाचा उपयोग इतरही कारणांसाठी मोठ्या प्रमाणात होतो व त्यातून कित्येकांना चांगला रोजगार तसेच उत्पन्न प्राप्त होत असल्याचे वास्तव आहे. उसाचा रस पिणाऱ्यांची आणि उस खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रसवंतीसाठी लागणाऱ्या उसाची पेरणीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

या पिकातून नगदी व चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळविता येते. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता ग्रामीण तसेच शहरी भागातही काळा ऊस खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काळ्या उसाची लागवड सुद्धा वाढली आहे.

अकोला जिल्ह्यात मात्र सिंचनाची, खारपानपट्ट्याची, हवामानाची आणि पावसाच्या लहरीपणाची समस्या कायम असल्याने रसवंतीसाठी व खाण्याच्या काळ्या उसाच्या लागवडीसाठी सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे. परंतु, या समस्येवरही मात करीत जिल्ह्यात बहुतांश भागात शेतकरी आता रसवंतीसाठी लागणाऱ्या व खाण्याच्या काळ्या उसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर करीत आहेत. कृषी अभ्यासकांच्या मते जिल्ह्यात जवळपास ३०० ते ४०० एकरावर ऊस लागवड होत असून, हे क्षेत्र निश्‍चित वाढणार आहे.


ऊस सेवनातून आरोग्य हित उसाचे फायदे
उसाचा रस/ऊस, उर्जेचा चांगला स्त्रोत, डीहायड्रेशनपासून बचाव, त्वचेसाठी उत्तम, तोंडातील दुर्गंधीवर उपाय, किडनीसाठी लाभदायी, अँटीऑक्सिडंट, पाचक, डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ऊस सेवनातून तसेच उसाचा रस पिण्यातून आरोग्य हित जोपासले जात असल्याने रसवंतीचा व्यवसाय सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे तर, ऊस खाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

जिल्ह्यात व जवळपास साखरकारखाने नाहीत. परंतु, संक्रातीसाठी, नवरात्रीसाठी लागणाऱ्या काळ्या उसाची व रसवंतीसाठी लागणाऱ्या उसाची लागवड जिल्ह्यात केली जाते. दोन हंगामात उस लागवड होत असून, पाण्याच्या उपलब्धतेनुसार व वाढत्या मागणीनुसार या उसाचे लागवड क्षेत्र वाढत आहे.
- गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

loading image