दुचाकी थांबवून मारहाण करीत खिशातील रोकड काढून चौघांनी लुटले

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 31 October 2020

दुचाकी थांबवून एकास मारहाण करत त्याच्या खिशातील रोकडसह एकूण चार हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुटल्याची घटना मोताळा-मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्यानजीक १९ ऑक्टोबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी (ता.२९) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : दुचाकी थांबवून एकास मारहाण करत त्याच्या खिशातील रोकडसह एकूण चार हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुटल्याची घटना मोताळा-मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्यानजीक १९ ऑक्टोबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी (ता.२९) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत पुंजाजी देशमुख (४४, रा. दाताळा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री राजेंद्र वासुदेव पाटील यांच्या घुस्सर फाट्यानजीकच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी मजुरीने स्वतःची ट्रॅक्टर व ट्रॉली नेली होती. दरम्यान, रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास मजुरांना तंबाखू आणण्यासाठी प्रशांत देशमुख व युनूस खान हे दोघे जण दुचाकीने घुस्सर फाट्यावरील हॉटेलवर गेले. तंबाखू घेऊन शेलापूरकडे परत जात असताना, पाठीमागून एक इंडिका कार आली.

कारमधील अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत (रा. वरखेड) व त्याचे तीन सहकारी यांनी दुचाकी थांबवायला लावली. तसेच प्रशांत देशमुख यांना लोखंडी पाईपने मारहाण करून खाली पाडले. तेव्हा भीतीपोटी युनूस खान तेथून पळून गेला.

दरम्यान, आरोपींनी प्रशांत देशमुख यांच्या खिशातील नगदी दोन हजार रुपये व दोन हजार रुपये किंमतीची चांदीची अंगठी असा एकूण चार हजारांचा ऐवज जबरदस्ती हिसकावून घेतला. या मारहाणीत प्रशांत देशमुख यांचा डावा हात फ्रँक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.

त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (ता.२८) रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर त्यांनी गुरुवारी सदर घटनेची तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रशांत पुंजाजी देशमुख यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत व अधिक तीन अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल जंजाळ करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Four persons robbed a man by stopping his two-wheeler and beating him