खळबळजनक: थेट आरटीजीएसमधून बँकांचीच होते फसवणूक

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 30 October 2020

खातेदाराच्या खात्याची संपूर्ण माहिती बँके व्यवस्थापकाला देवून संबंधित खात्यातून रक्कम वळती करण्याबाबतचा कॉल करीत थेट बँकेचीच फसवणूक करण्यात आली.

अकोला : खातेदाराच्या खात्याची संपूर्ण माहिती बँके व्यवस्थापकाला देवून संबंधित खात्यातून रक्कम वळती करण्याबाबतचा कॉल करीत थेट बँकेचीच फसवणूक करण्यात आली.

या प्रकारामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी बँकांनी खातेदारांच्या व्यवहाराबाबत एसएमएस अलर्ट सिस्टिम अद्यावत करणे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने खाते गोठवण्याची प्रक्रिया करण्याच्या सूचना सायबर सेलने दिल्या आहेत.

अकोला शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिरियन कॅथेलिक बँकेच्या शाखांमधून आरटीजीएस व्यवहारातून खातेदारांची जवळपास दहा लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली होती.

थेट बँक व्यवस्थापकाला फोन करीत घडलेल्या या फसवणूक प्रकारात बँकेच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार आरटीजीएस व्यवहार केला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार सायबर सेलने सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात ऑनलाइन फसवणूक होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजना सूचविण्यात आल्यात.

या उपाययोजना बँकांनी कराव्यात
- फसवणूक झाल्यास तत्काळ बँक खाते गोठवून रक्कम परत मिळविण्याचा प्रयत्न करावा
- सायबर सेलमधून बँकांशी संपर्क साधल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात
- ऑनलाइन ॲपद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एटीएम मॅसेज अलर्ट सिस्टिम अद्यावत करणे
- ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी वेगळे काऊंटर व बँकेतील मदतनिसाची नियुक्ती करण्यात यावी
- बँक अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सायबर सेलकडे द्यावे, जेणे करून फसवणुकीच्या प्रक्रियेत रक्कम परत मिळविण्यासाठी तातडीने कारवाई करता येईल
- बँके खातेदारांची जनजागृती करावी

एटीएममधील सुरक्षा बळकट करा
खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी बँकांनी एटीएममधील सुरक्षा अद्यावत करावी. सुरेक्षेसाठी एटीएममधील कॅमेरे अद्यावत करावे, अशी सूचना सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेस सपकाळ यांनी केली आहे. शहरातील बहुतांश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाहीत. एटीएममधील सीसी कॅमेरे बंद आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Banks were cheated directly from RTGS