शासकीय कर्मचारी करतात दररोज अपडाऊन, कामे रखडली

श्रीकृष्ण फुकट
Monday, 12 October 2020

कार्यालयात काम करणारे असंख्य कर्मचारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अकोला अपडाउन करत आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडल्याचा प्रकार समोर आला आहे.

आगर (जि.अकोला) ः पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या ग्राम आगर येथे ११ सभासद संख्या असणारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, महात्मा फुले विद्यालय, कृषी कार्यालय, बँक मंडळ कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी शासकीय कार्यालय असून या कार्यालयात काम करणारे असंख्य कर्मचारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अकोला अपडाउन करत आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडल्याचा प्रकार समोर आला आहे.

आगर गावाच्या परिसरात इतर गाव असल्यामुळे गावाशेजारी छोट्या-मोठ्या गावातील नागरिकांची दररोज वर्दळ असते. या गावात कोणत्याच विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत तलाठी कार्यालय जिल्हा परिषद शाळा विद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी विभागात जाताना तासंतास कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते.

कर्मचारीवर्ग वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात रात्री वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्यामुळे आरोग्य केंद्र व रुग्णवाहिनी असून सुद्धा नागरिकांना खासगी दवाखान्यात व खाजगी वाहनातून उपचारासाठी अकोला येथे जावे लागते. त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दाखल्यावरच मिळतो घरभाडे भत्ता
आगर सह ग्रामीण भागात मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरपंच, पोलिस पाटील यांच्यामुळे मुख्यालयी राहण्याचा दाखला मिळतो. सदर दाखला हा घरभाडे मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. दाखला मिळाल्यानंतर कर्मचारी अपडाऊन करण्यास मोकळे असल्याचे दिसून येत आहे.

आगरसह परिसरातील असंख्य गावात कार्यरत असल्यानंतर सुद्धा गावात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येईल.
- नितीन देशमुख, आमदार, बाळापूर

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Government employees are up to date every day, work is stalled