शासकीय अधिकारी, पदाधिकारीही कोरोनाच्या विळख्यात!

सुगत खाडे  
Thursday, 10 September 2020

आता कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळवला असून शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध पक्षांच्या पदाधिकारीही कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडत आहेत. कोरोनाचा संसर्ग व साखळी तोडण्यासाठी काम करणाऱ्यांनाच त्याची बाधा होत असल्याचे दिसून येत असल्याने सर्वांसमोर धोका वाढला आहे.

अकोला :  जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे रहिवाशी क्षेत्रातील नागरिकांनाच आतापर्यंत कोविड-१९ चा संसर्ग झाला. त्यासह डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी व इतर कोरोना योद्ध्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली.

परंतु आता कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळवला असून शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध पक्षांच्या पदाधिकारीही कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडत आहेत. कोरोनाचा संसर्ग व साखळी तोडण्यासाठी काम करणाऱ्यांनाच त्याची बाधा होत असल्याचे दिसून येत असल्याने सर्वांसमोर धोका वाढला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास सरकार व प्रशासन अपयशी ढरले आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रत्येक दिवशी शंभरावर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यासोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. महानगरानंतर आता कोरोनाचे रुग्ण गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेकच होत असल्याचे दिसून येत आहे.

पक्षांतराचे वारे जोमात, एकाच कुटुंबात वेगवेगळे झेंडे, भाऊबंदकीवर राजकारण पडतेय भारी! 

परिणामी नागरिकांना आता अधिक जागरुक राहावे लागणार आहे; परंतु बाजारासह शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी गर्दी वाढत असल्याने येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण वाढीचा हाच वेग पुढील काही दिवस कायम राहिल्यास जिल्ह्याची स्थिती स्फोटक होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
शासकीय कार्यालयातही शिरकाव
कोरोना विषाणूची शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुद्धा लागण होत आहे. गत काही दिवसांपूर्वी बाळापूर पंचायत समितीमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनातील परिचराला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

त्यानंतर आरोग्य व अर्थ विभागातील कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अकोला पंचायत समितीमधील पाच कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत अधिकारी सुद्धा कोरोनाग्रस्त आहेत. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे कोरोनाबाधित आढळत असल्याने इतरांना सुद्धा संसर्गाचा धोका वाढला आहे.

जि.प. उपाध्यक्षा व पती पॉझिटिव्ह
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड व त्यांचे पती हिरासिंग राठोड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी (ता. ७) रात्री उशीरा पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व उपाध्यक्षांच्या संपर्कातील इतर नागरिक जोखिमग्रस्त असून त्यांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने उपाध्यक्षांच्या दालनाचे निर्जंतुकीकरण केले असून त्यास बंद केले आहे.

पुढारी सुद्धा बाधित
गाव खेड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच महानगरात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या महापौर अर्चना मसने सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते दादा मते पाटील यांचा सुद्धा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे इतर पुढाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण असण्याची शक्यता वाढली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Government officials, office bearers also positive about Corona