esakal | कापसाचा उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Higher production cost of cotton, lower yield

तालुक्यात अतिवृष्टी बरोबर लांबलेल्या पावसाने कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बोंडअळी आली. भिजलेल्या कापसाला तीन-साडेतीन हजार रुपये तर सुक्या कापसाला साडेचार हजार रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कापसाचा उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी

sakal_logo
By
कृष्णा फंदाट

तेल्हारा (जि.अकोला)  ः तालुक्यात अतिवृष्टी बरोबर लांबलेल्या पावसाने कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बोंडअळी आली. भिजलेल्या कापसाला तीन-साडेतीन हजार रुपये तर सुक्या कापसाला साडेचार हजार रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.


यावर्षी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने तसेच लांबलेल्या पावसाने कपाशी पिकावर अनेक संकटे आली. ज्यांनी मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड केली होती, त्यांच्या पक्या झालेल्या कैऱ्या सडल्या. त्यामुळे नवीन येणाऱ्या फुलपात्यांवर अवलंबून राहावे लागते. त्याचे कैऱ्यामध्ये रूपांतर झाल्यावर कापूस वेचणीला आला. पुन्हा परतीच्या पावसाने जोर धरल्याने वेचनीला आलेला कापूस पूर्णपणे भिजून गेला.

अनेक भागात कापसाच्या वाती झाल्या. कापसाने उघडीप दिल्यावर शेतकऱ्यांनी कापूस वेचावा असा विचार केला तर मजूर मिळत नाही. प्रती किलो दहा रुपये प्रमाणे याचे काही भागांमध्ये वेचाई आहे.

उत्पादन खर्च जास्त असल्याने बऱ्यापैकी भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती; पण भिजलेला कापूस तीन-साडेतीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे खुल्या बाजारात विकत घेतला जात आहे तर सुका कापूस साडेचार हजार रुपये पर्यंत मागितला जात आहे.


सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा
सीसीआयकडून अद्याप हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या शेतकरी नाईलाजाने पडेल भावात व्यापाऱ्यांना कापूस विकत आहे. दुष्काळात तेरावा महिना याप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांपासून तेल्हारा परिसरात बोंडअळी आली आहे. त्यामुळे पुन्हा उत्पन्नामध्ये घट होईल. उन्हाळ्यातील मशागतीपासून तर कापूस बाजारपेठेत नेईपर्यंतचा खर्च बाघितल्यास उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 
गेले तीन वर्षेपासून अतिपावसाने सर्व पिकांचे उत्पन्न कमी मिळत आहे. गतवर्षी कापसाला पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. यावर्षी तोही नाही. मिळणारा भाव सध्याच्या महागाईच्या काळात उत्पादन खर्चाचा विचार करता परवडत नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
- जगदीश अरुळकार, कापूस उत्पादक शेतकरी, बेलखेड


सुक्या कापसाच्या तुलनेने ओल्या कापसाला भाव कमी मिळतो. कारण त्याची स्टेपल कमी होते. त्यामुळे ओल्या कापसाला तुलनेने भाव कमी असतो. जिनिंगवाले देखील ओला कापूस घेत नाही. त्यामुळे अडचण येते.
- प्रकाश भोंबळे, व्यापारी

(संपादन - विवेक मेतकर)

loading image