esakal | जागेच्या मोजणीविना अडकली घरकुलं!, मनपाने अद्याप मोजणी शुल्कच भरले नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Households stuck without land survey !, Corporation has not paid the survey fee yet

मनपा क्षेत्रातील गावठाण व गुंठेवारी संदर्भातील घरकुलांची सर्वच प्रकरणे प्रलंबित आहेत. अकोली बुजुर्ग व अकोली खुर्द आणि सोमठाणा येथील नागरिकांना मंजूर झालेली घरकुलं हे ब्लू लाईन (मोर्णा नदी पूर क्षेत्रात) आहेत.

जागेच्या मोजणीविना अडकली घरकुलं!, मनपाने अद्याप मोजणी शुल्कच भरले नाही

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः महानगरपालिकेच्या मूळ हद्दीसह वाढीव हद्दीतील गावठाण क्षेत्रातून घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांच्या जागेची मोजणी न झालयाने अद्यापही घरकुलं मंजूर होऊ शकली नाही. मनपाने जागा मोजण्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडे शुल्क जमा केले नसल्याने लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेच आहेत.


मनपा क्षेत्रातील गावठाण व गुंठेवारी संदर्भातील घरकुलांची सर्वच प्रकरणे प्रलंबित आहेत. अकोली बुजुर्ग व अकोली खुर्द आणि सोमठाणा येथील नागरिकांना मंजूर झालेली घरकुलं हे ब्लू लाईन (मोर्णा नदी पूर क्षेत्रात) आहेत.

त्‍यांची घरकुले मंजूर झाली असली तरी जागेचा प्रश्न कायम आहे. त्यांना शासनाकडून ई-क्लास जमिनीची मागणी करून तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया अद्याप राबविण्यात आली नाही. त्यामुळे ते लाभार्थीही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.

गावठाणमधील घरकुलांच्‍या मोजणी करिता ७७ लाख रुपये भूमी अभिलेख कार्यालय मोजणी करिता जमा करावयाचे आहेत. गेले अनेक महिन्यांपासून याबाबत महापौरांनी सूचना देवूनही मोजणी शुल्क जमा करण्यात आले नाही.

परिणामी गावठाणमधील घरकुल लाभार्थीही प्रतीक्षेतच आहेत. त्यामध्ये गुडधी, खरप, शिलोडा, शिवर, लोणी, शिवणी, नवीन हिंगणा, वाकापूर, नायगाव, मलकापूर, खडकी, अकोली या ठिकाणचे घरकुल लाभार्थींचा समावेश आहे. महानगरपालिकेकडे आतापर्यंत ६८ हजार लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज केले आहेत.


आढावा बैठकांमध्ये चर्चा, निर्णय ठप्प
घरकुल योजनेसाठी दर महिन्याला आठावा बैठक घेतली जाते. या बैठकांमध्ये एकच विषय वारंवार चर्चेला येतो. बैठक आटोपली की पदाधिकारी आणि अधिकारीही विषय विसरून जातात. त्यामुळे दोन वर्ष झाले तर घरकुलाचा प्रश्न आहे तेथेच अडकला आहे. यासंदर्भात ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा बुधवारी मनपात बैठक घेण्यात आली.

या बैठकीला महापौर अर्चना जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक धनंजय धबाले, हरीश काळे, अनिल मुरुमकार, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जयंत मसने, विलास शेळके, दिलीप मिश्रा, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, शून्‍य कन्सल्टन्सीचे मनीष भुतडा, मनपाचे श्रीकांत माणिकराव, विशाल गवई, बारगीर, काळे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.

संपादन - विवेक मेतकर