esakal | मी शेतकरी पुत्र, कपाशीतून कमावतो १९ रुपये!, वाचा शेतकऱ्यांची करुण कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: I am a farmers son, I earn Rs 19 from cotton !, read the tragic story of farmers

सध्या अनेक शेतकरी ग्रुपवर एका शेतकऱ्यांची करूण कहाणी सादर करणारा कपाशी या पिकाचा मेसेज व्हायरल होत असून, वर्षाला मिळणारे उत्पन्न व त्यातून वजा केलेला उत्पादन खर्च पाहता एका शेतकऱ्याला दिवसाला फक्त १९ रुपये शिल्लक राहतात हे हिशोबानीशी दाखविले गेले आहे.

मी शेतकरी पुत्र, कपाशीतून कमावतो १९ रुपये!, वाचा शेतकऱ्यांची करुण कहाणी

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) ः सध्या अनेक शेतकरी ग्रुपवर एका शेतकऱ्यांची करूण कहाणी सादर करणारा कपाशी या पिकाचा मेसेज व्हायरल होत असून, वर्षाला मिळणारे उत्पन्न व त्यातून वजा केलेला उत्पादन खर्च पाहता एका शेतकऱ्याला दिवसाला फक्त १९ रुपये शिल्लक राहतात हे हिशोबानीशी दाखविले गेले आहे.

तीच खरी वस्तुस्थिती असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत असून, शेती व्यवसाय करावा तरी कसा असा प्रश्न शेतकरी वर्ग प्रशासनाला विचारत असून उत्पादन खर्चावर पिकाला हमीभाव द्या ची शासनाकडे आर्त हाक मागत आहेत.

एक एकर कपाशीची शेती करीत असतांना नांगरणी ते शेतातील शेवटचे खुंट बाहेर काढण्यापर्यंत लागलेल्या खर्चाचे विवरण एका शेतकरी पुत्राने आलेखाच्या साहाय्याने मांडले असता एकरी ३०९०० रुपये खर्च येत असतांना एकरी बारा क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले व भाव चार हजारापर्यंत पकडला तरी ४८ हजारातून जवळपास ३१ हजार रुपये खर्च जात असतांना केवळ शेतकऱ्याकडे नफा हा १७ हजार रुपये राहतो.त्यामुळे महिन्याला शेतकऱ्याला १४११ तर दिवसाला १९ रुपये शुद्ध नफा मिळतो हेच यातून स्पष्ट होत आहे.

याशिवाय शेतातील विजपंपचे बिल व स्वतः शेतकऱ्यांची रात्रंदिवसाची मेहनत बघितली तर असा तोट्याचा धंदा फक्त शेतकरीच करू शकतो. हे पण यातून स्पष्ट होत असल्याने मायबाप सरकारने शेतकऱ्याने कवडीमोल किमतीत बोळवण होणाऱ्या या पिकाकरिता कमीत कमी ७ हजार रुपये भाव तरी द्यावा अशी मागणी करण्याकरिता व्हायरल मेसेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.


सर्व पिकांची हीच स्थिती, शेतकरी जगणार तरी कसा?
सद्या गेल्या अनेक वर्षापासून नवनवीन तंत्रज्ञानातून शेती प्रगत होत असली तरी उत्पादन खर्चही त्यामानाने वाढत चालला आहे.त्यात निसर्गाचे दृष्टचक्र घात करत असल्याने शेती ही न परवडणारी झाली आहे.उत्पन्न वाढले,उत्पादन खर्च वाढला मात्र पिकाचे भाव मात्र स्थिर राहत असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे भाव तेच कायम राहत असल्याने शेती करण्यापेक्षा मजुरी पुरली असे काहीशे चित्र सद्या तयार होत असल्याने कृषीप्रधान देश संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)