मृतदेहावरील पिपीई किट उघड्यावर, आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा

राम चौधरी 
Friday, 25 September 2020

सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. दररोज शंभरावर रुग्ण आढळून येत येत आहेत. यामधे कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोविड केअर सेंटरमधे मृत्यू झालेल्या रुग्णावर आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग यांच्याकडून अंत्यसंस्कार केले जातात.

वाशीम :  कोरोनाने सर्व जग कवेत घेतले आहे. दररोज शंभरावर रुग्णवाढ होत असताना वाशीम येथील मोक्षधाम स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे पिपीई किट व इतर साहित्य उघड्यावरच टाकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. दररोज शंभरावर रुग्ण आढळून येत येत आहेत. यामधे कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोविड केअर सेंटरमधे मृत्यू झालेल्या रुग्णावर आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग यांच्याकडून अंत्यसंस्कार केले जातात.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

येथील मोक्षधाम स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोक्षधाम विकास समितीने मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून मुख्य शेडमधेच कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.

याबाबत मोक्षधाम विकास समितीने कोणताही आक्षेप घेतला नसला तरी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट काढून टाकली जाते. या किटची विल्हेवाट लावण्याऐवजी ती बाजूलाच फेकून दिली जाते.

तसेच वापरलेले हातमोजे, मृतदेहावरील प्लास्टिक आजबाजूला फेकून दिले जाते. हा प्रकार अतिशय धोकादायक असून, आरोग्य यंत्रणांना कोरोनाचे गांभीर्य अजूनही कळले नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इतरांना बाधा होण्याची शक्यता
कोरोनाबाधीत व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आजबाजूला मृतदेहावरील साहित्य फेकून दिले जाते. मोक्षधाम ही वाशीम शहरातील एकमेव स्मशानभूमी असल्याने येथे दररोज एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ असते. त्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावरील साहित्य या नागरिकांच्या संपर्कात आले तर येथून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात आरोग्य यंत्रणेने जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.

मोक्षधाम स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जातात. मात्र तेथे मृतदेहावरील साहित्य जवळपास फेकून दिले जाते. याबाबत आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. या स्मशानभूमीत तसा सूचना फलक लावला जाईल.
- डाॅ.हरीश बाहेती, विश्वस्त मोक्षधाम विकास समिती

वाशीम नगरपालिका आरोग्य विभागाकडून आतापर्यंत सत्तर कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतदेहासोबत येणाऱ्या नातलगांनाही पिपीई किट अनिवार्य असते. एखाद्या वेळेस एखाद्या मृतकाच्या नातलगाने किट किंवा हातमोजे टाकले असतील तर याबाबत त्वरित दखल घेवून तसे आरोग्य विभागाला निर्देश देण्यात येतील.
- अशोक हेडा, नगराध्यक्ष, वाशीम

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Irresponsibility of health department after opening of PPE kit on dead bodies