मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली लक्झरी; त्याच ठिकाणी दुचाकीलाही अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Luxury slipped from the mound; Two-wheeler accident at the same place

मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी घसरल्याने झालेल्या अपघातात बस खाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामागून येणारी दुचाकीही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने दुचाकीस्वारही ठार झाल्याची घटना ता. २९ सप्टेंबर रोजी घडली. कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजिक पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान हा विचित्र अपघात घडला.

मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली लक्झरी; त्याच ठिकाणी दुचाकीलाही अपघात

कारंजा लाड (जि. वाशीम) ः  मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी घसरल्याने झालेल्या अपघातात बस खाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामागून येणारी दुचाकीही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने दुचाकीस्वारही ठार झाल्याची घटना ता. २९ सप्टेंबर रोजी घडली. कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजिक पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान हा विचित्र अपघात घडला.


प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २८ ई एल ४१०० क्रमांकाची लक्झरी बस औरंगाबादवरून नागपूरकडे जात असतांना मार्गातील टाकळी फाट्यानजीक रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली.

या अपघातात अमोल जोगेश खंडारे (वय २१) हा नागपूर येथील युवक हा लक्झरीखाली दबल्याने जागीच ठार झाला. बसमधील चेतना रमेश भगत, प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई असे पाचजण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर काही क्षणातच एम एच २७ ए टी ५७०३ क्रमांकाची दुचाकी याच मार्गाने जात असताना त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली. दुचाकीवरील मागे बसलेल्या प्रभाकर चंद्रभान वाघ (वय ५०) रा. शेंदुरजुना खु. ता. धामनगाव जि. अमरावती यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.

या दुचाकीवरील दोघेजण पंढरपूरहून अमरावतीकडे जात होते. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

कंत्राटदाराच्या चुकीने गेले दोन बळी
मागील काही दिवसांपासून कारंजा-अमरावती मार्गाच्या रूंदीकरणाचे व काॅंक्रिटीकरणाचे काम हैदराबाद येथील आर. आर. कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुरू आहे. हे काम करतांना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा टाकल्याने उपरोक्त दोन्ही अपघात घडले आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले नाही.

यापूर्वी देखील याच मार्गावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला होता. एकीकडे रस्तेविकास महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते बनविले जात आहे तर दुसरीकडे याच रस्त्यासाठी कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचा बळी दिल्या जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)