बिबट्या आला रे ऽऽऽ आला,  हरिणाच्या शिकारीनंतर आढळले मोराचे अवशेष

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 29 September 2020

 तालुक्यातील दहेगाव शेतशिवारात सलग दोन दिवस हरणाच्या मृतदेहा नंतर रविवार, ता.२७ रोजी मोराचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषा नजीक हिंसक प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. या एकंदरीत प्रकारामुळे दहिगाव परिसरामध्ये नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

तेल्हारा (जि.अकोला)  :  तालुक्यातील दहेगाव शेतशिवारात सलग दोन दिवस हरणाच्या मृतदेहा नंतर रविवार, ता.२७ रोजी मोराचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषा नजीक हिंसक प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. या एकंदरीत प्रकारामुळे दहिगाव परिसरामध्ये नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

तेल्हारा अडसूळ रस्त्यावर दहिगाव फाट्यानजिक तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांना ता.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस एक बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर शुक्रवार व शनिवारी याच शेतशिवारात एक हरीण शिकार केलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता ही शिकार बिबट्याने केली असावी असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तविला होता. आज सलग तिसऱ्या दिवशी दहीगाव फाट्यापासून पूर्वेस अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आस नदीच्या काठावर धडाधडी या शेतात मोराचे ताजे अवशेष आढळून आले व त्या ठिकाणी हिंसक पशूच्या पायाचे ठसे सुद्धा आढळून आले.

ही शिकार बिबट्याने केली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. सध्या शेतात उडीद सोयाबीन आदी पिके कापणीला आली असून, बिबट्याच्या धास्तीने शेतकरी व मजूर शेतात जाण्याचे टाळत आहे.

वन अधिकाऱ्यांनी लावलेल्या कॅमेऱ्यात काहीही आले नाही
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाची शिकार झालेल्या ठिकाण जवळ कॅमेरे लावले होते; परंतु या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे चित्रण झाले नाही. त्यामुळे या कॅमेराचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Peacock remains found after deer hunting Leopard terror continues in Dahigaon Shivara