महाबीजचे पत्र म्हणजे, स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न! : रविकांत तुपकर

akola news Mahabeej letter is an attempt to save one's own skin! : Ravikant Tupkar
akola news Mahabeej letter is an attempt to save one's own skin! : Ravikant Tupkar

अकोला : बोगस बियाण्यांसंदर्भात राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहता महाबीज कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून उलटपक्षी शेतकऱ्यांवरच दोष देण्याची नामी शक्कल लढविली आहे. बियाणांमध्ये दोष नसून तांत्रिक अडचणींमुळे बियाणे उगवले नाही, असे या पत्रात म्हटले आहे. महाबीज कर्मचाऱ्यांचे हे पत्र म्हणजे महाबीजची स्वत:ची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.


सोयाबीनचे बियाणे पेरल्यानंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. या तक्रारी पाहता महाबीजने आपल्यावरील घोंगडे झटकण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. महाबीज कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात नमुद आहे की, महाबीजचे बियाणांमध्ये दोष नसून तांत्रिक अडचणींमुळे बियाणे उगवले नाही. सोयाबीन बियाणे हे नाजूक व साठवणुकीच्या अनुषंगाने नाशवंत आणि संवेदनक्षम आहे. याहंगामात तक्रारींचे प्रमाण का वाढले ? तक्रारींमध्ये किती सत्यता आहे, असाही सवाल करून शेतकऱ्यांवरच दोष दिला आहे.

बियाणे उगवण्यास इतरही घटक कारणीभूत असताना बियाणांवरच दोष का ? शहानिशा न करता शेतकऱ्यांना दुसरे बियाणे देणे म्हणजे महाबीजच्या विश्वासाहेर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. या वादामुळे महाबीज कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास वाढत असून, त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे, असे या पत्रात नमुद आहे. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी या पत्राचा खरपूस समाचार घेतला आहे. महाबीज कर्मचाऱ्याचे हे पत्र म्हणजे आपली कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्ध्या शेतात घरचे बियाणे तर उर्वरित अर्ध्या शेतात महाबीजचे बियाणे पेरले आहे.

शेतकऱ्यांनी पेरेलेलं घरचे बियाणे उगवले; मात्र महाबिजचे उगवले नाही, असे का ? कारण महाबजीचे बियाणे बोगस असल्याचे सिद्ध होते. महाबीज कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत असेल तर शेतकऱ्यांचे काय ? महाबीजच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुसतेच मानसिक खच्चीकरण होत नाही तर त्यांच्या आत्महत्या वाढतात. मानसिक खच्चीकरण झाल्याने एकाही कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे मात्र उदाहरण नाही. हा संपूर्ण प्रकार संतापजनक आहे.

महाबीज कर्मचारी संघटनेने दिलेले पत्र आणि त्यांच्या या भूमिकेचा आपण तीव्र शब्दात निषेध करीत असून, बोगस बियाणे कंपन्या आणि महाबीजवर देखील कठोर कारवाई झालीच पाहीजे, अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com