
प्रलंबित विविध मागण्याकरिता ८ डिसेंबरपासून महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी साखळी उपोषण व आंदोलन करणार आहेत.
अकोला : प्रलंबित विविध मागण्याकरिता ८ डिसेंबरपासून महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी साखळी उपोषण व आंदोलन करणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून सातवा वेतन लागू केला आहे. जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची रक्कम देय असून, ती अदा करण्यात यावी. महाबीजने १२ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना लागू केली होती.
परंतु, २४ वर्ष सेवेचा लाभ लागू केला नाही व आश्वासीत प्रगती योजना कर्मचाऱ्यांना देणे बंद केले. ती सुरू करून दोन्ही योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. महाबीज संचालक मंडळाने २०१२-१३ ते २०१७-१८ असे सानुग्रह अनुदान मंजूर केले.
परंतु, त्यापैकी तीन वर्षाचे अनुदान अद्यापपावेतो देण्यात आलेले नाही. हा प्रश्न निकाली काढावा. समान पद समान वेतन लागू न केल्यामुळे कनिष्ठ प्र.सहा., प्र.सहा., शिपाई, ड्रायव्हर या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ती मागणी मंजूर करून सेवानिवृत्तांना न्याय द्यावा, अशा मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)