
वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीतून डावलण्यात आले.
अकोला : वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीतून डावलण्यात आले. याविरुद्ध मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.१) महावितरणच्या अकोला येथील विद्युत भवनापुढे धरणे देण्यात आले. यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंताना समाजाच्या वतीने निवेदनही देण्यात आले. महावितरणच्या पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदरावांची कागदपत्रे पडताळणी १ आणि २ डिसेंबर रोजी होत आहे. अकोला विभागातील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी अकोला येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात सुरू आहे. या कागदपत्रे पडताळणीसाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. हा मराठा समाजावर अन्याय असून, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया मराठा समाजात उमटत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी महावितरणने त्यांची चूक दुरुस्त करावी आणि मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारांचीही कागदपत्रे पडताळणी इतर उमेदवारांसोबतच करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयापुढे लोकशाही मार्गाने आंदोलनही करण्यात आले. एक दिवस धरणे देण्यात आले व विद्युत भवनापुढे निदर्शनेही करण्यात आली. या मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातील नेते, पदाधिकारी अशोक पटोकार, विनायकराव पवार, डॉ. अभय पाटील, प्रदीप चोरे, मनोज तायडे, कृष्णा अंधारे, पंकज जायले, पंकज साबळे, अजय गावंडे, योगेश थोरात, निखिल ठाकरे, विपुल माने, भूषण बैस, राजेश पाटील, ऋषिकेश थोरात, अभिजित टेकाडे, धनंजय घावट, यश काळे, निखिल बोंद्रे, संकेत जाधव, स्वप्निल थोरात, सुहास उमाळे, सौरभ देशमुख, प्रथमेश मानकर, श्रीकांत पुंडकर, नरेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
|
|||