esakal | दूर्दैव! दिव्यांगांनी स्वतःला नगरपंचायतमध्ये कोंडले पण प्रशासनाने आश्वासनावर केली बोळवण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: In Motala, the cripples locked themselves in the Nagar Panchayat but the administration called them on assurance.

दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिव्यांग बांधवांनी गुरुवारी (ता.३) स्वतःला मोताळा नगरपंचायत कार्यालयात कोंडून घेत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला.

दूर्दैव! दिव्यांगांनी स्वतःला नगरपंचायतमध्ये कोंडले पण प्रशासनाने आश्वासनावर केली बोळवण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मोताळा (बुलडाणा)  : दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिव्यांग बांधवांनी गुरुवारी (ता.३) स्वतःला मोताळा नगरपंचायत कार्यालयात कोंडून घेत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांनी न्याय हक्कासाठी टाहो फोडला. यावेळी नगरपंचायतीचे प्रशासक तथा एसडीओ मनोज देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत उचित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

येथील दिव्यांग लाभार्थ्यांना मागील रखडलेला व चालू वर्षातील पाच टक्के अनुदान वाटप करण्यात यावे. दिव्यांगांना नळपट्टीमध्ये नियमानुसार पन्नास टक्के सवलत देण्यात यावी. पंतप्रधान आवास योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुलाचा सर्व निधी एकत्रित देण्यात यावा. दिव्यांग विकास भवनासाठी नगरपंचायत अंतर्गत भूखंड उपलब्ध करून द्यावा, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने प्रशासनाला वारंवार निवेदन व स्मरणपत्रे देण्यात आली.

परंतु प्रशासनाने आश्वासनावर बोळवण केली. मध्यंतरी दिव्यांगांनी नगरपंचायतीमध्ये आंदोलन केल्यानंतर काही प्रमाणात अनुदान वाटप करण्यात आला. परंतु इतर मागण्या व रखडलेल्या अनुदानावर तोडगा निघाला नाही.

दरम्यान, दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी (ता.३) मोताळा नगरपंचायतमध्ये स्वतःला कोंडून घेत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याने बाहेर असलेल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली होती. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे या काही कामानिमित्त अमरावती येथे असल्याचे समजले. दरम्यान, नगरपंचायत प्रशासक तथा एसडीओ मनोज देशमुख यांनी मोताळा नगरपंचायतमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

तसेच नगरपंचायत प्रशासनाने दिव्यांगांच्या मागण्यांवर काय कार्यवाही केली, याचा आढावा घेतला. दरम्यान, विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर आठ डिसेंबर रोजी नगरपंचायतमध्ये चर्चेस आमंत्रित करून दिव्यांगांच्या मागण्यांवर शासन निर्देशानुसार उचित निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन नगरपंचायत प्रशासक तथा एसडीओ देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ठाणेदार श्री. गरुड, डॉ. शरद काळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप व नगरपंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

 या आंदोलनात प्रहार अपंग क्रांतीचे शहराध्यक्ष राजेश पुरी, तालुकाध्यक्ष सुरेश जवंजाळ, भगवान लेनेकर, लक्ष्मण दसरे, मो. निसार, समशेर खा पठाण, शेख रशीद शेख मुन्सी, शेख नवाब, फिरोज खा, गजानन सुरडकर, भागेश दोडे, सुनील हिवाळे, शबाना परवीन, डोंगरे यांच्यासह दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला.

एसडीओंची पत्रकारांना व्हिडीओ काढण्यास मनाई
मोताळा नगरपंचायत प्रशासक तथा एसडीओ मनोज देशमुख यांनी दिव्यांग आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व नगरपंचायत प्रशासनाने दिव्यांगांच्या मागण्यांबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा कार्यालय अधीक्षक श्री गाडेकर यांना केली. यावेळी पत्रकार बांधव बातमीसाठी व्हिडीओ चित्रीकरण करत असताना, एसडीओ देशमुख यांनी पत्रकारांना व्हिडीओ काढण्यास मनाई केली. त्यामुळे पत्रकार बांधव बाहेर निघून गेले. प्रशासनाने व्हिडीओ चित्रीकरणाचा धसका का घेतला, हे अनाकलनीय असल्याची चर्चा रंगली आहे.

...तर एसडीओंच्या खुर्चीचा ताबा घेणार
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आली. येत्या आठ डिसेंबरच्या चर्चेत दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास नगरपंचायत प्रशासक तथा एसडीओ मनोज देशमुख यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रहार अपंग क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष राजेश पुरी यांनी दै.सकाळशी बोलताना दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image