
शासन निर्णयानुसार आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील तेल्हारा येथे नाफेडची मका, ज्वारी खरेदी एजन्सी मिळावी अशा मागणी ता.९ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली.
तेल्हारा (जि.अकोला) : शासन निर्णयानुसार आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील तेल्हारा येथे नाफेडची मका, ज्वारी खरेदी एजन्सी मिळावी अशा मागणी ता.९ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली.
त्यानंतर देखील जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी सदर प्रस्ताव मंजूर न करता बाळापूर येथील स्व. वसंतराव दादळे खासगी कृषी बाजार समिती पारस या खासगी संस्थेला नाफेडची खरेदी एजन्सी दिल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी केला आहे.
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तेल्हारा येथे ही खरेदी सुरू करण्यात यावी अशा आशयाचे पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांना दिले होते. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे खरेदीला लागणारी संपूर्ण व्यवस्था, गोडावून, टिनशेड, ताडपत्री, इलेक्ट्रिक, काटे, शिलाई मशीन, मॉईशचर, मशीन, चाळण्या, मनुष्यबळ असतानाही जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी खासगी संस्थेला दिलेली नाफेडची एजन्सी रद्द करण्यात यावी व ती तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेला द्यावी जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी माल विक्रीची सुविधा होईल, असे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी सांगितले.
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडची मका, ज्वारी खरेदी तेल्हारा येथे सुरू व्हावी अशी मागणी करूनही हेतुपुरस्सरपणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमचा प्रस्ताव डावलून बाळापूर तालुक्यातील पारस येथील खासगी संस्थेला दिली. हे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याची खंतही सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.
(संपादन - विवेक मेतकर)