राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

विवेक मेतकर
Tuesday, 20 October 2020

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सध्या नांदुरा ते मलकापूर दरम्यान महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनलाच आहे. या महामार्गावर नांदुरा वडनेर मलकापूर दरम्यान जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून, हे खड्डे अनेकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेले आहेत.

नांदुरा (जि.बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सध्या नांदुरा ते मलकापूर दरम्यान महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनलाच आहे. या महामार्गावर नांदुरा वडनेर मलकापूर दरम्यान जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून, हे खड्डे अनेकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेले आहेत.

या खड्ड्यांमधे दुरुस्तीच्या नावाखाली केवळ चुरी टाकली जाते. जी वाहनधारकांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. दररोज या रोडवरून दुचाकीधारक मुठीत जीव घेवून प्रवास करतात. तरीही या रोडवर दररोज अपघात होत आहेत.

चांदुर बिस्वा येथील जयेश संजय भागवत हे त्यांच्या आई साधना संजय भागवतसोबत वडनेर जवळ प्रवास करताना चुरी टाकलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीवरून पडले असता त्यांची आई रोडवर फेकल्या गेली व जवळूनच एक कंटेनर गेला.

त्यामुळे त्यांचे डोळे, कपाळ, गाल व दात यांना जबर दुखापत झाली. याच खड्यामुळे नायगाव येथील संजय इंगळे यांचा एकोणवीस वर्षांचा एकुलता एक मुलचा अपघातात ठार झाला. राष्ट्रीय महामार्गाच चौपदरीकरणाचे काम २०१८ पासूनच बंद पडले आहे. तेव्हापासून या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे तात्पुरती डागडुजी करून बुजविण्यात येतात;

परंतु हीच डागडुजी या महामार्गावरील निष्पाप प्रवाशांचा बळी घेत आहे. या मार्गावर शासनाला अजून किती बळी हवे आहेत, म्हणजे या महामार्गावर काम चालू होईल, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: National Highway has become a death trap