आता उमेदवारांना तिनदा करावी लागेल गुन्ह्याची प्रसिद्धी

सुगत खाडे  
Wednesday, 23 September 2020

न निवडणूक आयोगाने यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडणूक काळात तिनदा गुन्ह्याची प्रसिद्धी करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांना येण्यास अटकाव बसेल, असे जाणकारांचे मत आहे.

अकोला :  निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती सार्वजनिक करत नाहीत. त्यामुळे मतदारांना योग्य उमेदवारची निवड करता येत नाही.

ही बाब लक्षात घेवून निवडणूक आयोगाने यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडणूक काळात तिनदा गुन्ह्याची प्रसिद्धी करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांना येण्यास अटकाव बसेल, असे जाणकारांचे मत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत. परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली.

संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणुकीय लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर दिला असल्याने आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक लढवणाऱ्यांना तिनदा त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असेल.

अशी द्यावी लागेल प्रसिद्धी
सुधारित दिशानिर्देशानुसार उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर पुढील प्रमाणे प्रसिद्ध करतील.

- प्रथम प्रसिद्धी ः उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या ४ दिवसांमध्ये.
- दुसरी प्रसिद्धी ः उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांमध्ये.
- तिसरी प्रसिद्धी ः ९व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (म्हणजेच मतदान होण्याच्या २ दिवस अगोदर)

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Now candidates have to publicize the crime three times