गुरुवारपर्यंतच संधी; प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

सुगत खाडे  
Wednesday, 7 October 2020

आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालकांनी शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी पालकांना एसएमएसद्वारे माहिती सुद्धा कळवण्यात आली आहे.

अकोला  :  आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालकांनी शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी पालकांना एसएमएसद्वारे माहिती सुद्धा कळवण्यात आली आहे.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. दरम्यान, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप साडेपाचशेवर जागा रिक्तच आहेत.

असे आहेत शासनाचे निर्देश
- सन २०२०-२१ या वर्षाकरिता प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया ८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल.
- शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल, परंतु पालकांनी फक्त मेसेज वर अवलंबून राहू नये.
- पालकांनी आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.
- शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये .

५६४ जागा रिक्तच
आरटीई कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी यावर्षी जिल्ह्यातील २०१ शाळांनीच रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामध्ये केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परंतु कोविडच्या स्थितीमुळे यावर्षी प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा उडाला. असे असले तरी आरटीई कोट्यातून आतापर्यंत १ हजार ७५९ निश्चित, तर एक हजार २१० विद्यार्थ्यांचा तात्पुरते प्रवेश देण्या आले आहेत. त्यामुळे आरटीई कोट्यातील ५६४ जागा रिक्त आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Opportunity till Thursday; Admission process started, students on waiting list will get RTE admission