घरमालकाच्या घरातच केली चोरी, अडीच महिन्यांपासून होता फरार पण...

मुशीरखान कोटकर
Tuesday, 15 September 2020

लॉकडाउनचा फायदा घेत घरमालकाच्या घरातील साहित्य चोरून फरार भाडेकरू चोरट्यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोपी बद्दल कुठलाही धागादोरा नसताना केवळ मोबाईल नंबर वरून अडीच महिन्यापासून फरार आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, पती-पत्नी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) :   लॉकडाउनचा फायदा घेत घरमालकाच्या घरातील साहित्य चोरून फरार भाडेकरू चोरट्यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोपी बद्दल कुठलाही धागादोरा नसताना केवळ मोबाईल नंबर वरून अडीच महिन्यापासून फरार आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, पती-पत्नी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

न्यायालयाने आरोपीस १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आदर्श कॉलनीतील रामदास गजेबा शिवणकर (वय ५३) यांच्याकडे काही महिन्यापूर्वी ओंकार अशोक खिराडे, लक्ष्मी ओंकार खिराडे पती-पत्नी भाड्याने राहण्यास आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पिंपरी चिंचवड, पुणे असा पत्ता सांगून भाड्याने रहात असलेल्या या जोडप्याने ता. २६ जूनच्या रात्री दरम्यान घर मालक घरी नाही व लॉकडाउनचा फायदा घेत घरमालकाच्या घरातील सीडी प्लेयर, होम थेटर, दोन पितळी समई, स्टील व पितळी भांडे असा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. मात्र संबंधित चोरट्याचा पत्ता, फोटो, मोबाईल नंबर काहीच नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात टाऊन जमादार गजानन भराड, कॉन्स्टेबल तुकाराम मोरे यांनी तपासकार्य मोठ्या शिताफीने सुरूच ठेवला.

तपासादरम्यान गुप्तहेराकडून आरोपीचा मोबाईल नंबर प्राप्त झाल्याने बुलडाणा गुन्हे शाखेद्वारे मोबाईल नंबर ट्रेस झाले. मोबाईल ट्रेसिंगमध्ये हिवरा आश्रम ठिकाण दाखविल्याने ता. १२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सापळा रचून हिवरा आश्रम येथून ओंकार खिराडे यास अटक केली. त्याने पंचांसमक्ष चोरी केल्याचे कबूल केल्यानंतर पती-पत्नी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपीस न्यायालयापुढे हजर करून त्याने चोरून नेलेला मुद्देमाल मिळवण्यासाठी पोलिस कोठडी मागितली असता न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. घर मालकाचे घर फोडून मौल्यवान साहित्य चोरून पळ काढणारा चोरटा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केला. महिला आरोपीस अटक करून चोरून नेलेल्या साहित्य लवकरच जप्त करू, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Police investigate fugitive thieves for two and a half months