खासगी रुग्णालयांचे होणार ऑडीट, रुग्णांकडून मनमानी वसुलीला लागणार चाप

सुगत खाडे  
Wednesday, 23 September 2020

खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये उपचार घेत असलेल्‍या कोविड बाधित रुग्‍णांकडून आयसीएमआर तसेच शासनाने निर्धारित केलेल्या दराने शुल्‍क आकारण्‍यात येत आहे किंवा नाही, या बाबतची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांचे लेखा परीक्षण होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऑडिटरची नियुक्ती केली आहे.

अकोला : खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये उपचार घेत असलेल्‍या कोविड बाधित रुग्‍णांकडून आयसीएमआर तसेच शासनाने निर्धारित केलेल्या दराने शुल्‍क आकारण्‍यात येत आहे किंवा नाही, या बाबतची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांचे लेखा परीक्षण होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऑडिटरची नियुक्ती केली आहे.

कोरोना बाधित रुग्णांची खासगी रुग्णालयातील लूट थांबवण्यासाठी शासनाने उपचाराचे दर निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत शासकीय दरातच रुग्णांवर उपचार करणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु त्यानंतर सुद्धा कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्यांकडून खासगी रुग्णालय जास्त पैसे घेत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खासगी रुग्णालयांद्वारे कोविड बाधितांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी त्यांनी लेखा परिक्षकांचा नियुक्ती सुद्धा केली आहे.

रोज द्यावा लागेल अहवाल
लेखा परिक्षणासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधीत रुग्‍णालयांमध्‍ये भरती झालेल्‍या तसेच डिस्‍चार्ज झालेल्‍या रुग्‍णांना विविध उपचाराकरिता आकारण्‍यात आलेल्‍या शुल्‍काची तपासणी करावी. त्यानंतर तपासणीचा दैनंदिन अहवाल विहित नमून्‍यात निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा अपर जिल्‍हादंडाधिकारी यांचेकडे न चुकता दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Private hospitals to be audited to curb arbitrary recovery