
वाशीम जिल्ह्यासाठी विकासाचा महामार्ग ठरणारा बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. खासदार विकास महात्मे यांनी ही माहिती मंगरुळपीरमध्ये आयोजित कृती समितीच्या बैठकीत दिली असून, पुढील महिन्यात रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
मंगरुळपीर (जि.वाशीम) ः वाशीम जिल्ह्यासाठी विकासाचा महामार्ग ठरणारा बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. खासदार विकास महात्मे यांनी ही माहिती मंगरुळपीरमध्ये आयोजित कृती समितीच्या बैठकीत दिली असून, पुढील महिन्यात रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
जिल्हा मागासलेला असल्याकारणाने केंद्राच्या आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक जिल्हा ठरला. तालुक्यामध्ये पाण्याची व दळणवळणाची कमतरता असल्याने औद्योगिक विकास होऊ शकला नाही.
महान-आर्णी व अमरावती-वाशीम राष्ट्रीय महामार्गमुळे दळणवळण वाढले आहे. तसेच, आता रेल्वेमार्ग सुद्धा मंगरुळपीर शहरा जवळून प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग निर्मितीच्या वेळेस जलसंधारणाच्या सांगड घालण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. त्यामुळे दळणवळण व पुरेशी पाण्याची पूर्तता होऊन. औद्योगिक क्षेत्रासह सर्व क्षेत्राला गती देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही दिल्लीमध्ये याकरिता सक्रीय आहोत.
प्रस्तावित बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग झाल्यास मंगरुळपीरला दळणवळणाच्या दृष्टिकोनातून देशाची जोडल्या जाणारा मार्ग आहे. यामुळे औद्योगिकसह सर्व क्षेत्राला गती प्राप्त होईल. स्थानिक पातळीवर सर्वांनी पक्षभेद विसरून जिल्ह्याच्या विकासाकरिता एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. महात्मे यांनी सांगितले. यावेळी हरीश खुजे, नागपूर कृती समितीचे अध्यक्ष सचिन कुळकर्णी, सचिव राम परंडे, पुरुषोत्तम चितलांगे, विरेंद्रसिंह ठाकुर, अरुण इंगळे, उमेश नावंदर, अभिषेक दंडे, डॉ. दिलीप रत्नपारखी, सचिन पवार, श्याम खोडे, रविंद्र ठाकरे, सुनील मालपाणी, किशोर भुतडा, नितीन बंग, विनोद जाधव, विशाल लवटे आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे मार्ग सुकर
गत ३० वर्षापासून प्रलंबित पडलेली बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाची मागणी नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्ग विस्तार कृती समितीचा गत दोन वर्षापासून सातत्यपूर्ण पाठपुरावा व अभ्यासपूर्ण रेल्वेमार्ग व जलसंधारणाची सांगड तसेच ‘रेल्वे पीपीपी मॉडेल’ हे मांडलेले दोन्ही प्रस्ताव आहे. यामुळे हा मार्ग मंजुरीसाठी सुकर झाला आहे. नियोजित प्रस्तावाप्रमाणे हा मार्ग निर्मिती झाल्यास कमी पैशांमध्ये या मार्गाची निर्मिती होणार आहे. येत्या महिन्यात सदर प्रस्ताव रेल्वेबोर्डाला सादर होणार आहे. अशी माहिती डॉ. महात्मे यांनी दिले.
आम्ही देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जलसंधारणाचा बुलडाणा पॅटर्न व तामसवाडा पॅटर्नच्या धर्तीवर बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या निर्मितीमध्ये जलसंधारणाची सांगड घालावी, ‘पीपीपी रेल्वे मॉडेल’ असे दोन प्रस्ताव मांडले होते. त्यांच्या सूचनेवरून दोन्ही प्रस्तावाच्या ब्ल्यूप्रिंट तयार असून, रेल्वेमार्ग निर्मितीचा ‘वाशीम जिल्हा पॅटर्न’ निर्माण केला आहे. सदर दोन्ही प्रस्ताव रेल्वेमार्ग प्रस्तावासोबतच केंद्र शासनाला प्रस्तावित करण्यात येईल. अशी माहिती नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वे मार्ग विस्तार कृती समिती अध्यक्ष सचिन कुळकर्णी यांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)