रेशन दुकानदारांचे कमिशन सरकारी तिजोरित!

सुगत खाडे  
Saturday, 29 August 2020

दुकानदारांना कमिशनची रक्कम देण्यासाठी पाच कोटी रुपये जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानंतर सुद्धा कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे. लवकरच कमिशन न मिळाल्यास दुकानदार आंदोलन करू शकतात.

अकोला :  गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे.

विशेष म्हणजे दुकानदारांना कमिशनची रक्कम देण्यासाठी पाच कोटी रुपये जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानंतर सुद्धा कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे. लवकरच कमिशन न मिळाल्यास दुकानदार आंदोलन करू शकतात.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्यात आले.

त्यानंतर सदर योजनेला शासनाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यासह पाच किलो तांदुळा येवजी लाभार्थ्याना तीन किलो मोफत गहू व दोन किलो मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले. सदर धान्याचे वाटप मोफत होत असल्याने केंद्राकडून आलेल्या अतिरिक्त तांदुळाच्या बदल्यात रेशन दुकानदारांना कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांनी केली होती.

सदर मागणी शासनाने मंजुर केली होती व रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल मागे १५० रुपये कमिशन जाहीर केले होते. परंतु रेशन दुकानदारांनी एप्रिल, मे व जून महिन्याचे धान्य वितरण केल्यानंतर सुद्धा त्यांना कमिशनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपये मिळाल्यानंतर सुद्धा कमिशनची रक्कम देण्यास उशीर होत असल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे.
 
पाच कोटी मिळाले; परंतु वाटप रखडले
जिल्ह्यात एक हजार ५६ रेशन दुकानदार आहेत. प्रत्येक दुकानातून एप्रिल, मे, जून महिन्यासाठी लाख क्विंटलवर धान्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे साधारणतः प्रत्येक रेशन दुकानदाराचे ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे कमिशन शासनाकडे प्रलंबित आहे. परिणामी दुकानदार कमिशन देण्याची मागणी करत आहेत.
 
रेशन दुकानदारांना कमिशनचे पेमेंट ऑनलाईन द्यायचे आहे. त्यामुळे दुकानदारांचे बॅंक खाते क्रमांक व इतर माहिती गोळा करण्यात येत आहे. काही रेशनदुकानदारांनी अपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे कमिशन देण्यास अडचणी येत आहेत. संपूर्ण माहिती गोळा होताच त्यांना कमिशन देण्यात येईल.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Ration shopkeepers agitation stopped due to commission