esakal | मोबाईल हातात आला अन् वाचनाचा नाद पोरका झाला
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Reading decreased due to mobile

आज-काल प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. त्यावरील सोशल मीडियावर बहुतांश जण व्यस्त असतात. मोबाईल हातात आला व जीवनाचा अविभाज्य अंग झाला. त्यामुळे वाचनाचा नाद मात्र पोरका झाला. वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या आदी नजरेआड पडलेल्या दिसतात.

मोबाईल हातात आला अन् वाचनाचा नाद पोरका झाला

sakal_logo
By
संतोष गिरडे

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः आज-काल प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. त्यावरील सोशल मीडियावर बहुतांश जण व्यस्त असतात. मोबाईल हातात आला व जीवनाचा अविभाज्य अंग झाला. त्यामुळे वाचनाचा नाद मात्र पोरका झाला. वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या आदी नजरेआड पडलेल्या दिसतात.

विज्ञानाने प्रगती केली व सर्व काही नवनवीन पाहायला मिळत असताना, पूर्वी वाचन करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. मात्र आता प्रत्येकाकडे आलेल्या अँड्रॉइड मोबाईलमुळे बहुतांश जण त्यातच व्यस्त असलेला दिसतो. वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या, कवितासंग्रह आदीस जणू मागणीच राहिली नाही.

पूर्वी वाचण्याची गाढ आवड असलेल्या मंडळीकडून मिळेल तिथून विविध पुस्तके आणली जायची. मात्र मोबाईलमुळे व त्यातील सोशल मीडियामुळे कुणालाही पुस्तकाची गरज राहिली नाही. अगदी वाचनासाठी लागणारे पुस्तकेही त्यावर मिळू लागलेत पण, वाचण्यापेक्षा अनेकजण दिवस-रात्र सोशल मीडियावर जसे व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, गूगल, यूट्यूब आदीवर गुंतलेले दिसून येतात.

लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेलेला असून, मोबाईलजवळ नसल्यास काहीतरी हरवल्याचे भासते. रिकाम्या वेळात आता पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाईलवर बहुतांश जण गुंतलेले असतात. पूर्वी हवी असलेली पुस्तके विकत आणणे किंवा लायब्ररीतून घेतल्या जायचे तर, लायब्ररीत वाचकांची मोठी गर्दी देखील दिसायची.

परंतु, आता लायब्ररीतील गर्दी नाहीशी झाली तर, पुस्तके विकत आणून किंवा लायब्ररीतूनआणून वाचणे इतका वेळही कुणाकडे नसल्याचे निदर्शनास पडते. वाचनाने माणूस मोठा होतो, असे पूर्वी म्हणायचे आता मोबाईलने माणूस मोठा होतो की काय? असे वाटू लागले आहे. वाचनाचा छंद जोपासणारी मंडळी देखील मोबाईलवरच वाचन करताना दिसते.

आता तर कोरोना काळात लहान मुलेहीचे अभ्यासासाठी मोबाइलचा वापर करीत आहेत. अभ्यासापेक्षा गेमवरच अनेक मुले व्यस्त असतात. मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आल्यापासून वाचनाचा नाद मात्र पोरका झाला. काही वर्षांनंतर पुस्तके, वाचन या गोष्टीच लोप पावतात की काय? असे वाटू लागले आहे. जेव्हापासून अँड्रॉइड मोबाईल हातात आला, तेव्हापासून वाचण्याचा नादच दूर झाला असे सर्वत्र दिसत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)