कोरोनासह डेंगीचा धोका वाढला, आतापर्यंत ११ रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 24 October 2020

जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने थैमान घातलं आहे. असे असले तरी कोरोनासह डेंगी, मलेरियाचे रुग्ण सुद्धा जिल्ह्यात आढळल्याचे दिसून येत आहे.

अकोला  ः जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने थैमान घातलं आहे. असे असले तरी कोरोनासह डेंगी, मलेरियाचे रुग्ण सुद्धा जिल्ह्यात आढळल्याचे दिसून येत आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंगीचे १९ तर महानगरात २ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता कोरोनासह डेंगीपासून सुद्धा सावध राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेले असतानाच नागरिकांना इतर आजार सुद्धा होत आहेत. ताप, सर्दी, खोकल्या सारखे लक्षण असलेले रुग्ण कोरोनाने ग्रस्त असल्याने त्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.

परंतु याव्यतिरीक्त काही रुग्णांना सतत ताप असल्यामुळे ते डेंगी व मलेरिया ग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने जानेवारी २०२० पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली असता ग्रामीणमध्ये १९ तर शहरी भागातील २ रुग्णांना डेंगी झाल्याचे समोर आले आहे.

याच कालावधीत मलेरियाचे सुद्धा ९ रुग्ण आढळल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता योग्य उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The risk of dengue has increased with corona, 11 patients have been found in the district so far