अकोला रेल्वे स्टेशनसाठी मिळाले दीडशे कोटी, अजून ७५० कोटी रुपये मिळणार-संजय धोत्रे

विवेक मेतकर
Monday, 19 October 2020

 केंद्र सरकार सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने अकोला रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तसेच ७५० कोटी रुपये प्रस्तावित आहे. यामुळे सामान्य नागरिकांना  व रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी सांगितले.

अकोला: केंद्र सरकार सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने अकोला रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तसेच ७५० कोटी रुपये प्रस्तावित आहे. यामुळे सामान्य नागरिकांना  व रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी सांगितले.

अकोला रेल्वे स्थानक येथे एक वीस फुटाचा राष्ट्रीयध्वज, ब्रिटिशकालीन शकुंतला इंजन लोकार्पण सोहळा तसेच एकशे वीस फुटाच्या एलईडी लाईट लोकार्पण सोहळ्यात ते आज रविवारी बोलत होते. 

धोत्रे पुढे म्हणाले की, केंद्र सरकार प्राचीन धरोहर जतन करण्याचे काम करीत आहे. या अनुषंगाने ब्रिटिश कालीन आणि विदर्भातील लोकप्रिय शकुंतला रेल्वेचे 1911 चंद्रभागा इंजन अकोला रेल्वे स्टेशनच्या अग्र व दर्शनीय भागी ठेवून, नवीन पिढीला नवी दिशा देण्याचे काम करीत आहे. तसेच विदर्भात सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज  उभारणीचे काम सुरू करून राष्ट्रभक्तीचे कार्य जनतेला समर्पित करण्याचे सौभाग्य जनतेच्या कृपेने प्राप्त झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ डिव्हिजनचे डीआरएम विवेक गुप्ता, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, राजेंद्र गिरी, एडवोकेट सुभाष ठाकूर, ज्ञान प्रकाश खंडेलवाल, वसंत बाछुका, सतीश ढगे, माधव मानकर, रमेश खोबरे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर विनोद बोर्डे, डॉक्टर कृष्ण तिकांडे, दीपक मायी, संजय जिरापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नामदार धोत्रे यांनी केंद्र सरकार 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास'  या पद्धतीने कार्य करीत असून, covid-19 याला आव्हान समजून रेल्वे विभागाने विकास पर्वाला गती दिली. अकोला रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुविधेसाठी निर्माण कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्लॅटफॉर्म नंबर एक, दोन, तीन येथे शेड उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच रेल्वे स्टेशन सुशोभीकरण कार्यासाठी ७२० कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

या  विकास कामाला मंजुरी मिळाल्यानंतर अकोला शहरातील रेल्वे स्थानक हे सर्व सुविधायुक्त होणार असल्याचेही या वेळी धोत्रे यांनी सांगितले.

अकोट रेल्वे स्थानकाला सुद्धा मोठे स्थान प्राप्त होवून अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाश्यांना सुविधा, आदिवासी क्षेत्र व शेतकऱ्यांना माल वाहतुकी साठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही नामदार धोत्रे  यांनी सांगितले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी विकास कामाचा आढावा सांगितला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Rs 150 crore received for Akola railway station, another Rs 750 crore to be received: Sanjay Dhotre