चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत सोने-चांदीसह लुटला दोन लाखांचा ऐवज

अनिल दंदी
Thursday, 22 October 2020

झोपेत असलेल्या वृद्धेला उठवत चाकूचा धाक दाखवून मारहाण करत अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एक लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका जणाचे घरफोडून पंचविस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

बाळापूर (जि.अकोला) : झोपेत असलेल्या वृद्धेला उठवत चाकूचा धाक दाखवून मारहाण करत अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एक लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका जणाचे घरफोडून पंचविस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या दोन्ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनारखेड येथे घडल्या आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रमाबाई इंगळे ही वृद्ध महिला मनारखेड येथे एकटी राहते. मंगळवारी रात्री जेवण करून ती झोपली होती. रात्री दोन वाजताच्या सुमारास सदर महिलेला जाग आल्यानंतर तिच्या खाटे जवळ एक इसम हातात चाकू घेऊन उभा असल्याचे तिला दिसला. दुसरा व्यक्ती दूर उभा होता. या दोघांच्याही हातात लाकडी दांडा व चाकू होता.

एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने लुटले व त्यानंतर त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. यावेळी घरातील वीस ग्रॅम वजनाची निंबोळी मण्याची जुनी एकदानी, ८ ग्राम एक डोरले व २ गॉम सोन्याचे मणी व फुले, चांदीचे जोडवे व पैंजण, १५ ग्रॅम वजणाचा सोन्याचा गोफ, २ ग्रॅम वजणाची लहान मुलाची अंगठी, १० ग्रॅम वजनाचे सोन्याची ताराची अंगठी, १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे असा १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सुखदेव नामदेव वाळे यांच्या घराकडे वळविला. सुखदेव वाळे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील पंधरा हजार रुपये नगदी व सोन्याची दागिने असा पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे, हे चोरटे मराठी भाषेत बोलत होते.

त्यामुळे हे चोरटे याच भागातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज सकाळी घटनेची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके यांनी बाळापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच बाळापूर पोलिस, ठसे तज्ज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Rs 2 lakh looted along with gold and silver