आरटीओ कार्यालयच अनधिकृत इमारतीमध्ये, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर  स्थलांतरणाचे आश्वासन

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 30 September 2020

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अनधिकृत इमारतीमध्ये असल्याने ते अधिकृत असलेल्या इमारतीत स्थानांतरित करण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी (ता.२९) कार्यालयावर धडक देऊन आंदोलन केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यालय स्थलांतरनाचे लेखी आश्वासन दिले.

अकोला : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अनधिकृत इमारतीमध्ये असल्याने ते अधिकृत असलेल्या इमारतीत स्थानांतरित करण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी (ता.२९) कार्यालयावर धडक देऊन आंदोलन केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यालय स्थलांतरनाचे लेखी आश्वासन दिले.

मंगरूळपीर मार्गावर कौलखेड जवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय एका इमारतीमध्ये कार्यरत आहे. या इमारतीवर महानगरपालिकेने अनधिकृत इमारत म्हणून कारवाई केली होती. अशा अनधिकृत इमारतीत शासनाचे एखादे कार्यालय चालविणे योग्य नसल्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी एक निवेदन देऊन कार्यालय अधिकृत इमारतीत इतरत्र स्थानांतरित करण्याबाबत विनंती केली होती.

शिवाय या इमारतीमध्ये आपल्या कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना वाहने उभी करण्याकरिता पुरेशी जागा नसल्याने वाहनधारक मंगरूळपीर राज्यमहामार्गावर आपली वाहने उभी करतात, त्यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहे. याबाबतही अवगत करण्यात आले होते.

परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मर्गदर्शनात मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, माजी नगरसेवक पंकज गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महासचिव परीमल लहाने, महानगराध्यक्ष करण दोड यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

तेव्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यालय स्थानांतरण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दोन महिन्यात या कार्यालयाचे स्थानांतरण झाले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हातात घन घेऊन कार्यालय पाडण्याचे आंदोलन करेल, असा इशारा शिवा मोहोड यांनी यावेळी दिला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: RTO office in an unauthorized building, assurance of relocation after NCP agitation