सरपंचाने पंचायत समिती कार्यालयातच केला आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 11 November 2020

मूर्तिजापूर तालुक्यातील पोहीचे सरपंच किशोर नाईक यांनी विस्तार अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाला कंटाळून सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : मूर्तिजापूर तालुक्यातील पोहीचे सरपंच किशोर नाईक यांनी विस्तार अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाला कंटाळून सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

विकास कामासंदर्भात पंचायत समितीला जिल्हा परिषदकडे कृती आराखडा पाठविण्याठी वारंवार विनंती करूनही सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी बी. पी. पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे कारण सांगून सरपंच किशोर नाईक यांनी सोमवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान पंचायत समिती कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोहणा बॅरेज प्रकल्पात पोही येथील अनेक शेतकऱ्यांची शेती गेली आहे.

गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनाचे कारण पुढे करुन या गावचा विकास कृती आराखडा पाठविण्यास पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी (पंचायत) बी. पी. पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. विकास कामे थांबविता येणार नसल्याचे महसूल व वनविभाग (पुनर्वसन ) मंत्रालय मुंबई, यांनी २६ मे २००५ रोजी एका परिपत्रकात नमूद केले आहे.

तरी सुध्दा या गावाचे नाव विकास कृती आराखड्यातून वगळण्यात आले. मात्र किशोर नाईक यांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना व विस्तार अधिकारी पजई यांना वारंवार केलेली विनंती दुर्लक्षित राहिली. विस्तार अधिकाऱ्यांनी विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मागविले. ते आणल्यानंतरही विकास आराखडा जिल्हा परिषद अकोला यांच्या पाठविण्यात येत नसल्याने गावाचा विकास थांबला असल्याने ही टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचे सरपंच किशोर नाईक म्हणाले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sarpanch attempted self-immolation in Panchayat Samiti office