यंदाची दिवाळी होणार गोड, मिळणार 20 रुपये किलोने साखर

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना (शेतकरी) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे.

अकोला  :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना (शेतकरी) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे.

त्याचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार कार्डधारकांना मिळणार आहे. कार्डधारकांना अनुदानित दरात म्हणजेच २० रुपये प्रतिकिलोने सदर साखरेचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे प्राधान्य व एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांची यावेळची दिवाळी गोड होणार आहे.

केंद्र शासनाने फेब्रुवारी, २००१ पासून फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच नियंत्रित साखरेचे वितरण करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना अधिक साखर मिळावी याकरिता सुरुवातीला प्रतिमानसी ४२५ ग्रॅम ऐवजी ५०० ग्रॅम परिमाण ठरविण्यात आले होते.

त्यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाच्या नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्रीचा दर केंद्र शासनाने १ मार्च २००२ रोजी १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो निश्चित केला होता. परंतु नंतरतच्या काळात साखरेच्या वाटपावर शासनाने नियंत्रण आणले.

त्याअंतर्गत प्रतिमानसी येवजी प्रतिकार्ड साखरेचे वाटप करण्यात आले. त्यासह साखरेच्या परिमाण सुद्धा प्रतिकार्ड एक किलो निश्चित केले. त्यामुळे सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील अंत्योदय गटातील कार्डधारकांनाच प्रतिमाह साखरेचे एक किलो वाटप करण्यात येत आहे.

आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना एपीएल (शेतकरी) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ८४ हजार कार्डधारकांना होईल व त्यांची दिवाळी गोड होईल.

अंत्योदयच्या लाभार्थ्यांना नियमित वाटप
जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेखालील ४५ हजार ९२३ कार्डधारक आहेत. त्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रति महिना प्रतिकार्ड एक किलो साखरचे वाटप रेशन दुकानातून करण्यात येते. २० रुपये प्रतिकिलो दराने सदर वाटप करण्यात येते. या लाभार्थ्यांना नियमित प्रमाणात व दरातच साखरचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या लाभात कोणत्याच प्रकारचा फरक पडणार नाही.

प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना (शेतकरी) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार कार्डधारकांना लाभ मिळेल.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: This year Diwali will be sweet, you will get sugar at Rs 20 per kg